मुंबई | Mumbai
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मोठ्या अडचणीत सापडली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी भाजपाने देशभरातील नेत्यांना निमंत्रित केले आहे. मुंबईतील प्रभाक क्र. ४७ येथे प्रचार करण्यासाठी भाजपाचे तमिळनाडूमधील नेते के. अण्णामलाई आले होते. यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी मुलाखतीत मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अण्णामलाई यांनी ‘बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी’ अशा आशयाचे विधान केले आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, या अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांकडून भाजपला घेरायला सुरुवात झाली आहे. हे विधान समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईत ट्रिपल इंजिन सरकारची वकिली केली. मुंबईतल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे असल्याचा दावा त्यांनी केला. चेन्नईत डिएमके आहे. तर केंद्रात भाजप आहे. बंगळुरूमध्ये काँग्रेस, केंद्रात भाजप, हैदराबाद येथे काँग्रेस आणि केंद्रात भाजप असे समीकरण आहे. पण मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य असल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे. केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर पाहिजे असे ते म्हणाले.
या शहराचे बजेट ७५ हजार कोटी इतके आहे, हा काही कमी पैसा नाही. चेन्नईचे बजेट ८ हजार कोटी आहे. तर बंगळुरूचे १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रशासनात चांगले लोक बसवायला पाहिजे, जेणेकरून ते शहराच्या बजेटचा योग्य वापर होईल,” असे विधान अण्णामलाई यांनी केले.
हा १०६ हुतात्म्यांचा अपमान आहे
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली असता त्यांना अण्णामलाई यांच्या विधानाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. गर्जना चांगली असली तरी तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणतात. यावर त्यांनी उत्तर दिले पाहिजे.
अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. “अण्णा फन्ना झन्ना विरूद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. हा १०६ हुतात्म्यांचा अपमान आहे. त्याला अटक करून मुंबईच्या बाहेर जाऊ दिले नाही पाहिजे. अण्णा सरकारच्या थोबाडात मारून गेला. देवेंद्र फडणवीसांनी याचे उत्तर द्यायला हवं.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा



