विरार | Virar
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना अडवले. त्यानंतर तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा आणि बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.
विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे पैशांची बॅग घेऊन गेल्याचा आणि पैसे वाटप केल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला.यावेळी विनोद तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तसेच या हॉटेलमधील एक व्हिडीओमध्ये देखील समोर आला असून त्यात पाकिटं दिसत आहेत, ती पैशांचीच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे बविआच्या आरोपाचे विनोद तावडे यांनी खंडन केले असून आम्ही पैसे वाटले नाहीत, असे तावडेंनी सांगितले आहे.
दरम्यान,याबाबत बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले की, विनोद तावडे विवांत हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानापूर्वी ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचे आहे. सरकार त्यांचेच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा