Saturday, July 27, 2024
Homeजळगावभाजपा नेत्यांनो, ‘वागणं सुधारा’ : खान्देशी जनमताचा इशारा

भाजपा नेत्यांनो, ‘वागणं सुधारा’ : खान्देशी जनमताचा इशारा

राज्यात महायुतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असताना जळगाव जिल्हा मात्र भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दिसला. नंदुरबार आणि धुळ्यात झालेला पराभव, जळगावातील दोन्ही जागी गेल्या वेळपेक्षा घटलेले मताधिक्य याचा एकच अर्थ काढता येतो. ‘वागणं सुधारा, अन्यथा विधानसभेत काही खरं नाही’ असा इशाराच खान्देशी जनतेने महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या नेत्यांना दिला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेला लोकसभा निवडणुकांचा धुराळा अखेर शांत झाला आहे. देशपातळीवर भाजपाचा मोठा अपेक्षाभंग झाला. 400 पारचा नारा मुखभंग करणारा ठरला. राज्यात महायुतीला तोडफोडीचा हिशोब द्यावा लागला. खान्देशात लोकसभेच्या चार जागा आहेत. पैकी रावेर, जळगाव व धुळे या तीन जागा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहेत.काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार मतदारसंघ 2014 पासून भाजपाकडे गेला. म्हणजेच चारही जागा भाजपाकडे होत्या. पैकी आता दोन जागी भाजपा तर दोन जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. राज्यात महायुतीची मोठी पडझड झाली असताना जळगाव जिल्ह्याचा निकाल मात्र भाजपाला दिलासा देणारा म्हटला पाहिजे. राज्यात महायुतीची जी वाताहात झाली त्याच्या मुळाशी गेले तर शिवसेना असो वा राष्ट्रवादी, भाजपाने जे तोडाफोडीचे राजकारण केले ते सामान्य जनतेला रुचलेले नाही असा अर्थ काढण्यास मोठा वाव आहे. मात्र ही फुटपट्टी जळगाव मध्ये का लागली नाही? हे मात्र अनाकलनीय आहे. तोडफोडीची शिक्षा भाजपाला मिळाली असे गृहीत धरले तर 11 पैकी सहा आमदारांनी त्यांचा पक्ष सोडला त्या जळगाव जिल्ह्यात मात्र भाजपाला भरभरून मिळाले आहे. एकट्या जळगाव मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील हे शिवसेनेतून तर मंत्री अनिल पाटील हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून सहा पैकी चार आमदार पक्षातून बाहेर पडून देखील फुटीर, गद्दार हे विरोधकांचे मुद्दे येथे प्रभावी ठरलेले नाहीत.

- Advertisement -

रावेरमधून रक्षा खडसे तिसर्‍यांदा तर जळगाव मधून स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. 2019 साली ज्या पद्धतीने श्रीमती वाघ यांना ऐन वेळी दूर सारले गेले होते त्याची सहानुभूती त्यांना आता मिळाली, असाही अर्थ काढता येतो. रावेर मध्ये एकनाथ खडसे यांनी घेतलेली मेहनत फायद्याची ठरली आहे. भाजपा प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले एकनाथ खडसे प्रचाराच्या मैदानात उतरले नसते तर रक्षा खडसेंचा विजय आज इतका भव्य राहिला असता का हा प्रश्नच आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उद्योजक श्रीराम पाटील हा नवखा चेहरा असूनही फार उपयोग झालेला नाही. श्रीराम पाटील यांच्यासाठी सारा मराठा समाज एकवटला असे चित्र तयार करण्यात आले होते, ते फसवे असल्याचे निकालाने दाखवून दिले. एक मोठा समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा अन्य लहान समाज देखील एकवटतात हे रावेरच्या निकालाने दाखवून दिले. निवडणुकीत व्यवस्थापन महत्वाचे असते. श्रीराम पाटील लढत होते रावेरमधून मात्र त्यांचे निवडणूक व्यवस्थापन जळगावातून हलत होते. पक्षाच्या पदाधिकार्‍यांपेक्षा बाहेरील काही मित्रांच्या हाती सुत्रे गेल्याने पक्षांतर्गत नाराजीचाही फटका त्यांना बसला असू शकतो. भाजपावरील राग काढण्याचा मतदारांचा इरादा होता मात्र सक्षम उमेदवार विरोधक देऊ शकले नाही असाही अर्थ जळगावातील दोन्ही निकालातून निघतो.
मंत्री गिरीश महाजन यांना निरंकुश सत्ता या जिल्ह्याने दिली. त्यातुलनेत ते अधिक प्रभावी काम करु शकले असते. मात्र संकटमोचक म्हणून देवेंद्र फडणवीस यांची धुणी धूत बसल्यामुळे घरच्या विकासकामांकडे त्यांना पुरेसे लक्ष देता आले नसावे असे त्यांचे विरोधक उपहासाने बोलतात. जळगाव मध्येही उमेदवार नवा होता, स्वतः उन्मेष पाटील यांनी लढण्याची हिम्मत दाखवली असती तर कदाचित चित्र काहीसे वेगळे असते. उन्मेष पाटलांबाबत सहानुभूती होती, त्यांच्या कारकिर्दीवर फारसे आक्षेपही नव्हते मात्र लोकांना तुम्ही गृहीत धरू शकत नाही. उन्मेष पाटलांनी निवडणुकीत मित्राला पुढे केले मात्र, ‘तुमच्या मैत्रीचे ओझे आम्ही का म्हणून वाहायचे’ असा विचार मतदारांनी कशावरून केला नसेल?

नंदुरबार मध्ये गावित घराण्याचा एकछत्री अंमल जनतेने झूगारून लावला आहे. मंत्री तुम्हीच, खासदार तुम्हीच, जिल्हा परिषदही तुमच्याच ताब्यात… या घराणेशाहीला जनता कंटाळली होती. शिवाय एकहाती सत्ता एकवटल्यामुळे जो उद्दामपणा गावित कुटूंबांमध्ये आला होता, त्याने लोक त्रासले होते. स्वतः हिना गावित या मोदी यांच्या जवळच्या होत्या, संसदरत्नही होत्या. पण हे यश त्यांना पचवता आले नाही. चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी असलेला दुरावा, भाजपामधीलच अनेकांची ओढवून घेतलेली नाराजी डॉ.हिना गावित यांना भोवली. पक्षाच्या आमदारांनाही डावलण्याचे प्रकार या मतदारसंघात झाल्याचे बोलले जाते. उलटपक्षी काँग्रेसचा अगदीच नवखा उमेदवार भारी पडला. येणार्‍या विधानसभेत डॉ.विजयकुमार गावित हे भाजपा ऐवजी अपक्ष लढल्यास आश्चर्य वाटयला नको. लोकसभा निवडणुकांच्या धामधूमीत स्वतः डॉ.गावित यांनीच हे सुतोवाच केले होते. काँग्रेसने नंदुरबारचा बालेकिल्ला दणक्यात ताब्यात घेतला आहे.

धुळ्यातून भाजपाचे डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव अपेक्षितच होता. गेल्या वेळी अडीच लाखांवर मताधिक्य घेणार्‍या डॉ.भामरे यांना यावेळी निसटता पराभव स्विकारावा लागला. डॉ.भामरे यांची दहा वर्षांची कारकीर्द सपशेल नापास असणारी आहे. तीन साडेतीन वर्षे केंद्रात मंत्रिपद मिळुनही ते फारसे काही करू शकले नाहीत. महानगरपालिकेत आवाजवी हस्तक्षेप, दिल्लीपेक्षा मुंबईतील मंत्रालयात ते अधिक रमतात, असा आरोप त्यांचे विरोधक करतात. डॉ.भामरे यांनी पक्ष संघटनेत केलेले बदल वादग्रस्त ठरले होते. मित्र पक्षांशी त्यांनी जुळवून घेतले नाही असाही आक्षेप घेतला गेला. त्याचा फटका डॉ.भामरे यांना बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झालेले मानापमान नाट्य महाग पडल्याचेही हा निकाल सांगतो. अन्यथा डॉ.बच्छाव यांना विजयासाठी इतके झुंझावेे लागले नसते. मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण, एकही प्रभावी मुस्लीम उमेदवार नसणे, माजी आमदार अनिल गोटे, आ.कुणाल पाटील यांनी घेतलेली मेहनत व डॉ. भामरेंबद्दलची नाराजी यामुळे बाहेरील उमेदवार म्हणून हिणवल्या गेलेल्या डॉ.शोभा बच्छाव यांचा विजय सुकर झाला. जळगाव, रावेर मध्ये भाजपाच्या पारड्यात विजयश्री पडली, धुळे, नंदुरबारमध्ये अपयश आले. खडसेंनंतर आता मंत्री गिरीश महाजन खान्देशातील भाजपाचे कर्तेधर्ते आहेत. धुळ्याचेही ते प्रभारी आहेत. त्यामुळे खान्ेदशातील भाजपाच्या यशापयशाचे पालकत्व मुख्यत्वे मंत्री महाजन यांचेच आहे. महाजन यांनी नाशिकचे पालकत्वही घेतले होते, त्या नाशिकमधील दोन्ही जागा भाजपाने गमावल्या आहेत. राज्याच्या एकूणच निकालावरुन देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीतील महत्व कमी होणार आहे. याचा फटका आपसूक गिरीश महाजन यांनाही बसू शकतो. अशा स्थितीत स्थानिक नेत्यांनो, वागणं सुधारा अन्यथा विधानसभेत महाग पडेल असा इशाराच खान्देशी जनतेने निकालातून दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या