दिल्ली । Delhi
मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सक्रिय सहभाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशींवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत शाह यांनी पंतप्रधान मोदींनी “दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विजय शाह एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “दहशतवाद्यांनी आमच्या हिंदू बांधवांना अपमानित केले. त्यांनी आमच्या बहिणींना विधवा केलं. त्याचे उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या समाजातील बहिणींना त्यांच्या घरी पाठवले.” या विधानामुळे कर्नल कुरेशी यांचा उल्लेख अपमानजनक स्वरूपात केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विरोधकांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटर (एक्स) वर पोस्ट करत म्हटलं की, “कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याने दिलेलं विधान हे अत्यंत लज्जास्पद आणि खालच्या दर्जाचं आहे. अशा मंत्र्याला तात्काळ पदावरून हटवायला हवं.” मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देताना विजय शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी विचारलं की, “मंत्र्यांच्या नीच विचारांशी भाजप सहमत आहे का?”
https://x.com/kharge/status/1922267681081770366
वाद वाढत असताना विजय शाह यांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला. “जर माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावलं असेल, तर मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. कर्नल कुरेशी या माझ्या बहिणीपेक्षाही अधिक आदरणीय आहेत,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांचा आक्रोश यानंतरही शांत झालेला नाही. काँग्रेससह इतर पक्षांनी शाह यांचं मंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे. काही नेत्यांनी या वक्तव्याला देशातील शूर महिलांचा अपमान म्हणूनही संबोधले आहे.
या वादावर भाजपच्या अंतर्गत गटातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे मध्य प्रदेश सरचिटणीस हितानंद शर्मा यांनी विजय शाह यांना भोपाळ येथील पक्ष मुख्यालयात बोलावून त्यांच्यावर ताशेरे ओढले, अशी माहिती सूत्रांनी दिली. शर्मा यांनी प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने ते व्यथित झाले होते. त्या भावनेतूनच त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्यांनी आपली लष्करी पार्श्वभूमीही सांगितली आणि कुटुंबातील अनेक सदस्य देशासाठी शहीद झाल्याचंही नमूद केलं.
https://x.com/ANI/status/1922248122425868429
दरम्यान, भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी धाडसाने मोहिम पार पाडली असून त्याबद्दल देशभरातून त्यांचं कौतुक झालं होतं. अशा एका महिला अधिकाऱ्याविषयी सार्वजनिक मंचावर अशा पद्धतीचं विधान करणं, हे विरोधकांच्या मते अत्यंत गैर आहे. विजय शाह यांचं हे विधान आणि त्यानंतर सुरू झालेल्या प्रतिक्रिया भाजपसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. आता पक्षाकडून यावर अधिकृत कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.