Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या

धक्कादायक! भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या

मुंबई । Mumbai

कल्याण पूर्वमधील शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्राचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार (firing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.. खळबळजनक बाब म्हणजे हा जीवघेणा हल्ला भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी स्वतः केला आहे. या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, महेश गायकवाड यांचे मित्र आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यात आमदार गणपत गायकवाड आणि हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस किती दिवस कठोडी मागणार? हे पाहावे लागणार आहे.

मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला – गणपत गायकवाड

पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी (महेश गायकवाड) ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो (महेश गायकवाड) वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे.” असं गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच गोळीबार केला असं त्यांचं म्हणणं आहे.

पुढे बोलताना गणपत गायकवाड म्हणाले, मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती. माझा निधी वापरुन काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. दादागिरी करुन हे होतं आहे. मी राज्य शासनाचा निधी आणला आणि कामं केली तिथे श्रीकांत शिंदेंनी त्यांची कामं म्हणून बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावं. मी दहा वर्षांपूर्वी जागा घेतली होती. त्यांना पैसेही दिले होते. पण ते सही करायला येत नव्हते. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो. केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावे झाला. मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा, जबरदस्ती कब्जा घेऊ नका. कोर्टाने ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊ. मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही. पोलीस स्टेशनच्या आवारात तो ५०० लोक घेऊन आला होता. माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोळीबार केला. मी एक व्यावसायिक आहे, माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार? माझ्या मुलाला कुणी मारलं तर मी सहन करणार नाही.

तसेच, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत. माझ्याबरोबरही गद्दारीच केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत. कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य असेल. पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहे. असंही गणपत गायकवाड म्हणाले.

इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान या गोळीबार प्रकरणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हंटले आहे, इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!

महाराष्ट्रात गुंडाराज, सत्तेची मस्ती आलीये फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात गुंडाराज आहे, गँगवॉर रस्त्यावर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहु फुलेंच्या महाराष्ट्रात गॅगवॉर होत असेल तर दुर्दैवी आहे. हा प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे. ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हकक मिळवून देतील. दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे. फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का?मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या