मुंबई । Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. सुरक्षेच्या कारणात्सव संजय राऊतांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: एक्सच्या माध्यमातून दिली.
मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात संजय राऊत यांनी असा निर्णय घेतल्यानं राजकीय विरोधकांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. अशात संजय राऊत यांचे कट्टर विरोधक राज्याचे मंत्री व भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नितेश राणे यांनी एक्सवरून शेअर केली आहे.
“संजय राऊतजी….काळजी घ्या, लवकर बरे व्हा!”, असं लिहत मंत्री नितेश राणे यांनी काळजी करणारी पोस्ट खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक्सवरून शेअर केली आहे.
खरंतर नितेश राणे हे संजय राऊत यांचे कट्टर विरोधक आहेत. सरकारी विरोधी आणि भाजपविरोधी भूमिका संजय राऊत यांनी घेतल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नितेश राणे हे अग्रेसर असत. शिवाय, संजय राऊत नेहमीच राणे कुटुंबावर टीका करताना दिसतात, तर नितेश राणे यांनी देखील अनेकदा राऊत यांच्यावर तीव्र भाषेत टीका केली आहे. मात्र, सध्या त्यांनी राऊतांना लवकर बरे होण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
खासदार राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती – जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या”, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीसह महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी त्वरित प्रकृती सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे”, असे म्हटले आहे.




