बीड । Beed
भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, त्यांनी अचानक धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात टीकेची लाट उसळली आहे. यामुळे मस्साजोग गावातील नागरिक देखील संतप्त झाले आहेत. आज सुरेश धस यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे मोकाट का? असा सवाल आज सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळते आहे असाही आरोप सुरेश धस यांनी केला आहे. मोठमोठे बूट घातलेले चित्रविचित्र लोक इथे आरोपींच्या समर्थनार्थ येत आहेत, असा आरोप करत कृष्णा आंधळे याला त्वरित अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, वाशी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करून त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
धस यांनी एसआयटीला स्वत:च्या सहीने पत्र पाठवून आरोपींमध्ये संजय केदार, सारंग आंधळे यांचाही समावेश करावा, अशी मागणी केली आहे. आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नीवर देखील कारवाई करावी, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच, या प्रकरणात शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून, चार्जशीट दाखल करण्यापूर्वी मस्साजोग गावकऱ्यांनी आठ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. संतोष देशमुख यांचे पार्थिव केजच्या शासकीय रुग्णालयात नेण्याऐवजी इतरत्र का वळवण्यात आले, याची चौकशी करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, दहावा आरोपी अद्याप त्यात समाविष्ट नाही. त्याचा सहभाग खंडणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दहाव्या आरोपीवरही ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. तसेच, फरार आरोपी नितीन बिक्कड यालाही आरोपी करण्यात यावे, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला आहे.