दिल्ली | Delhi
बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. ‘केंद्र सरकारने रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्यात यावे, या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनीच करावी’, असे त्यांनी म्हटले आहे. कंगना रणौत यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली.
कंगना रणौत यांचं शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर भाष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी महिला आंदोलकांवर पैसे घेऊन धरणे आंदोलन केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, कंगना रणौत यांनी आता कृषी कायदे पुन्हा लागू करण्यासंदर्भात विधान केल्यानंतर भाजपाने स्पष्टीकरण देत कंगना रणौत यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. यानंतर कंगना रणौत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत कृषी कायदा परत लागू करण्यातबाबत केलेल्या विधानबाबत माफी मागितली आहे. तसेच “मी माझे शब्द मागे घेते”, असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत मीडियाने मला कृषी कायद्यावर प्रश्न विचारले आणि मी काही सूचना दिल्या की शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना कृषी कायदा परत आणण्याची विनंती करावी. माझ्या वक्तव्याने अनेक लोक निराश झाले आहेत. जेव्हा कृषीविषयक कायदे आले तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता, नंतर आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने कृषीविषयक कायदे मागे घेतले आणि त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की मी आता फक्त एक कलाकार नाही तर भाजपची कार्यकर्ती आहे. माझी मते माझी स्वतःची नसावीत, ती पक्षाची भूमिका असली पाहिजे. जर मी माझ्या बोलण्याने किंवा विचाराने कोणाची निराशा केली असेल. म्हणून मी माझे शब्द परत घेते.
काय म्हणाल्या होत्या कंगना रणौत?
माध्यमांसोबत बोलतना कंगना म्हणाल्या, ‘माझं हे वक्तव्य वादग्रस्त असू शकतं याची मला कल्पना आहे. पण कृषी कायदे लागू करायला हवेत. शेतकऱ्यांनी स्वतः अशी मागणी करायला हवी. शेतकरी हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. मला त्यांना आवाहन करायचे आहे की त्यांनी स्वतःच्या हितासाठी कायदे परत आणावेत.’ असं देखील कंगना म्हणाल्या होत्या.
हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट