मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून (Tomb of Aurangzeb) वाद सुरु आहे. नागपूरमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपच्या खासदाराच्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना ओडिशातील बारगड मतदारसंघातील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अकलेचे तारे तोडले. मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा या खासदारांनी केला.
आता त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगती पथावर नेण्यासाठी पुन्हा जन्म घेतला असा अजब दावाही पुरोहित यांनी केला. यासाठी त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संतांचा आधार घेतला. या संतांनीच आपल्याला ही माहिती दिली असेही खासदार पुरोहित म्हणाले.
प्रदीप पुरोहित यांच्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील प्रदीप पुरोहित यांच्यावर अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्टद्वारे टीका केली.
वर्षा गायकवाड X वर लिहितात, “अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे,” असा आरोप गायकवाड यांनी केला.
“या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका. शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे,” अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.