मुंबई । Mumbai
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालाने यंदा इतिहास घडवला आहे. गेल्या २५ वर्षांपासून असलेली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एकहाती सत्ता संपुष्टात आली असून भाजपने मुंबईत मुसंडी मारली आहे. एकूण २२७ जागांपैकी महायुतीने ११४ या बहुमताच्या आकड्याला सहज पार केले आहे. मात्र, या विजयानंतर आता मुंबईचा पुढचा महापौर कोण असेल आणि तो मराठी असेल की अमराठी, या चर्चेने राजकीय वर्तुळ तापले आहे.
निवडणुकीच्या निकालानुसार, भारतीय जनता पक्षाने ८९ जागा जिंकून मुंबईतील आपला आजवरचा सर्वात मोठा ‘स्ट्राइक रेट’ नोंदवला आहे. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २९ जागा पटकावल्या आहेत. या दोन्ही पक्षांचे मिळून एकूण ११८ नगरसेवक होत असल्याने महायुतीला इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य झाले आहे. शिवसेना (UBT) ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला २४ आणि मनसेला ६ जागा मिळाल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ विजयी नगरसेवकांपैकी तब्बल ७५ नगरसेवक अमराठी समाजातून आहेत. विशेष म्हणजे या अमराठी प्रतिनिधींमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. भाजपकडून ३३ अमराठी नगरसेवक विजयी झाले असून काँग्रेसचे १८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ८, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४ अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय एमआयएमचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, समाजवादी पक्षाचे २ आणि मनसेचा १ अमराठी नगरसेवक आहे.
सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असला तरी, महापौर कोणाचा यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. २०२६ हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने, सन्मान म्हणून महापौर पद आपल्या पक्षाला मिळावे, अशी आग्रही मागणी शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या मते, किमान अडीच वर्षांसाठी तरी शिवसेनेचा महापौर असावा.
दुसरीकडे, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान ‘मराठी कार्ड’ वापरून अमराठी वर्चस्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे भाजप आता मराठी चेहरा महापौर म्हणून देणार की अमराठी मतदारांना खूश करण्यासाठी वेगळा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे राज्य आणि केंद्र स्तरावरील नेते यावर अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती मिळत आहे.




