नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत आहेत. विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडी देखील नुकत्याच करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, आता लवकरच भाजपाला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे. खरे तर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला विलंब झाल्याचे बोलले जात आहे. पण पुढच्या काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यक्षपदावरून चाललेल्या चर्चांमध्ये आता एक ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपाला पहिल्यांदा महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकते असे बोलले जात आहे. या संदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा असली तरी या पदासाठी नेमकी कोणाची नावे शर्यतीत आहेत? याविषयीची माहिती देखील समोर आली आहे. या पदासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आंध्र प्रदेश भाजपच्या माजी अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी आणि तामिळनाडूच्या आमदार वनाथी श्रीनिवासन या प्रमुख दावेदार आहेत.
जे पी नड्डांचा कार्यकाळ संपला, तरी…
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २०२० पासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपला. मात्र, भाजपाने त्यांचा कार्यकाळ २०२४ पर्यंत वाढवला होता, जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवली जाईल. पण आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोण भूषावेल याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. आता नवीन अध्यक्षाची निवड करताना पक्षात मतभेद दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला अध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा पक्षासाठी एक निर्णायक आणि ऐतिहासिक टप्पा ठरेल.
निर्मला सितारामन
केंद्रीय अर्थमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री असलेल्या सीतारामन यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये असून, त्यांनी नुकतीच भाजप मुख्यालयात अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपा अध्यक्षपदाच्या दावेदारांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे. दक्षिणेत पक्ष संघटनेतील घसरण पाहता सीतारमण यांची निवड तामिळनाडूमध्ये भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते.
डी. पुरंदेश्वरी
आंध्र प्रदेश भाजपच्या माजी अध्यक्ष असलेल्या डी. पुरंदेश्वरी यांचे नावही भाजप अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्या एक बहुभाषिक नेत्या असून त्यांचा अनुभव आणि राजकीय कारकीर्द अनेक पक्षांमधून सिध्द झालेली आहे. त्यांनी परराष्ट्र दौऱ्यावर “ऑपरेशन सिंदूर” मध्ये प्रतिनिधित्व केले होते.
वनथी श्रीनिवासन
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वनथी श्रीनिवासन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. वनथी श्रीनिवासन यांनी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. वनथी श्रीनिवासन या तामिळनाडूच्या कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आहेत. तसेच त्यांनी कमल हासन यांचा पराभव केलेला आहे. 1993 पासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या वनाथी यांनी राज्य सचिव, सरचिटणीस आणि तामिळनाडू प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळले आहे. 2020 मध्ये त्यांना भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आणि 2022 मध्ये त्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या – त्या तामिळनाडूतील पहिल्या महिला होत्या ज्यांना हे पद मिळाले.
जर भाजप महिला अध्यक्षाची निवड करत असेल, तर हा पक्षाच्या इतिहासात पहिलाच प्रसंग असेल. 33 टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होणाऱ्या महिला प्रतिनिधित्व धोरणाशी भाजपचा हा निर्णय सुसंगत ठरेल, असे मानले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




