श्रीरामपूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील भाजपा ओबीसी उपजिल्हाध्यक्ष लखन लोखंडे यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. पण प्रसंगावधान राखून त्यांनी चाकूचा वार मुठीत धरल्याने बचावले. या हल्ल्यात लोखंडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लखन लोखंडे नेहमीप्रमाणे अशोकनगर रस्त्यावर चालले होते. त्यांना डबल चौकी येथे अज्ञात व्यक्तींनी अडविले. लगेचच एकाने चाकूने लोखंडे यांच्यावर हल्ला चढविला. त्याने पोटाच्या दिशेने चाकूचा वार करण्याचा प्रयत्न केला. पण हे लक्षात येताच लोखंडे यांनी चाकू मुठीत धरून प्रतिकार केला. यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर चाकू शिरून सहा टाके पडले आहेत. संबंधित हल्लेखोराने पुन्हा त्यांच्या मांडीवर चाकूने वार केले. तर एक वार त्यांच्या पायाच्या पोटरीवर केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर हे व्यसनाधीन व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने नागरिकाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी काल रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
…अन्यथा नागरिकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता
अशोकनगर हे लोकसंख्येने तालुक्याच्या अग्रणी असलेले गाव आहे. परंतु या गावामध्ये कायदा सुव्यवस्था अनेक वर्षापासून धोक्यात आलेली आहे. यामुळे निपाणी वडगाव मधील सर्वसामान्य नागरिक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा यासंदर्भात नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.