मुंबई | Mumbai
पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिला होता. यावरुन बावनकुळेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनीही एक कविता ट्विट करत बावनकुळेंवर निशाणा साधला होता. याला महाराष्ट्र भाजपने ट्विटरवरुन कवितेतूनच प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळेंच्या पोस्टला रिपोस्ट करत भाजपाने म्हटलं,
“दहा कोटींची वांगी
उगवते माझ्या शेतात
कोणती ही मशागत?
चर्चा जनमाणसात
बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला
‘ते’रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला
अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा ‘शरद’ बहरला
आम्हा, बाप – लेकीला,
आस एक लावसाची
जमीन लाटून कष्टकऱ्यांची
माडी उभारू ‘शरदचंद्रा’ची
राजकीय कारकिर्द 53 वर्षाची
हौस भारी बिरुदे मिरवण्याची
काय सांगू माझ्या पप्पांची महती,
जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती..”
सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेल्या कवितेत काय?
चला, आपण धाब्यावर जाऊ…
( हेरंब कुलकर्णी)
मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!
धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले ” हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?”
मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले …..
न्यायमूर्ती लोया नागपुरात,
नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
समोर मेन्यू कार्ड धरले …
शेतकरी आत्महत्या भागात,
दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा ,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?
मी विचारले कंटाळून,
अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
तुम्ही गिफ्ट काय घेणार ?
कंटाळून विचारले शेवटी मी –
९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
पत्रकारांची
ताडोबात ट्रीप कधी काढायची ?
आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..
हेरंब कुलकर्णी
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?
२०२४ ची लोकसभा निवडणूक होऊपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या या अभियानाच्या सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ज्या बुथवर काम करतो, तेथील सर्व पत्रकारांची माहिती मिळवा. त्या भागातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, स्वत:चे पोर्टल चालविणारे पत्रकार हेही पहावेत. आपण एवढे चांगले करीत असताना ते जणू बॉम्बस्फोट झाल्यासारखी बातमी देतात. त्यामुळे आपल्या बुथच्या हद्दीत जे कोणी चार-पाच पत्रकार असतील त्यांची यादी तयार करा. त्यात सगळ्या मीडियाचे येतील असे पहावे. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यालया बोलवा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे काय करायचे ते समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झाले तर मदतीला खासदार विखे पाटील आहेतच, असेही बावनकुळे म्हणाले.