अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
अभिनेता सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असून त्यांनी केवळ हवेतील आरोप करू नयेत. ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावे. मागील पाच वर्षांत ज्या पोलिसांचे संरक्षण घेतले आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ नये, या शब्दात आ. रोहित पवार यांनी भाजपला सुनावले.
शुक्रवारी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. पवार पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊनच्या मुद्यावर आ. पवार म्हणाले, केंद्र सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य व अर्थकारण याचा ताळमेळ घालून पुढे जावे लागेल. सध्या नगरमध्येही कोरोना चाचण्या वाढवलेल्या आहेत. यावर लोकप्रतिनिधी लॉकडाऊनची मागणी करत असेल तर त्यांना केंद्र सरकारचा निर्णय मान्य नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो, असे सांगत राष्ट्रवादीचे आ. पवार यांनी नगर जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचे संकेत देऊन लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खासदार सुजय विखे यांना टोला लगावला आहे. पूर्वी दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी होती आता ती केंद्राने दोन व्यक्तींना केली आहे. या करोनाच्या काळात आरोग्य व अर्थकारण याचा मेळ घालावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर प्रत्येकाला काळजी घ्यायचीच आहे. परंतु दुसरीकडे उपाशी राहून कोणाचा जीव जायला नको. त्यामुळे यावर मध्य मार्ग काढून पुढे जावे लागेल. लॉकडाऊन उठवण्याच्या दिशेने केंद्र निर्णय घेत आहे. मग केंद्राचे निर्णय आपल्याला मान्य नाहीत का? असा टोला त्यांनी खासदार विखे यांना लगावला.