Friday, September 11, 2026
Homeराजकीयभाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याचा अखेर राजीनामा, ट्विटवर पोस्ट केलं राजीनामा पत्र

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याचा अखेर राजीनामा, ट्विटवर पोस्ट केलं राजीनामा पत्र

दिल्ली। Delhi

राष्ट्रीय राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आक्रमक आणि प्रमुख टीव्ही चेहरे मानले जाणारे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाचा आणि सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. पूनावाला यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून आपला राजीनामा तात्काळ स्वीकारण्याची विनंती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पूनावाला भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, मात्र आता त्यांनी स्वतः पत्र सार्वजनिक करत यावर शिक्कामोर्तब केले आहे.

- Advertisement -

शहजाद पूनावाला यांनी सोमवारी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवरून हे राजीनामा पत्र शेअर केले. या पत्रात त्यांनी यापूर्वी ३० जुलै २०२६ रोजी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. पूनावाला म्हणाले, “मी माझ्या वैयक्तिक आणि आर्थिक कारणांमुळे यापूर्वीच पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पक्षाने तो स्वीकारला नाही आणि मला निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी वेळ दिला. हा माझ्यासाठी अत्यंत भावुक करणारा क्षण होता.”

आपल्या पत्रात त्यांनी पुढे नमूद केले आहे की, “मी या विषयावर खूप विचार केला असून अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि ज्या विशिष्ट व्यक्तींबद्दल मी पक्षाध्यक्षांना सविस्तर माहिती दिली आहे, त्या घटनांमुळेच मला माझ्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहावे लागले आहे.”

जरी मी पक्षाच्या व्यवस्थेतून बाहेर पडत असलो तरी भाजपची विचारधारा आणि तत्त्वे कधीही सोडणार नाही, असे पूनावाला यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. भविष्यात खासगी क्षेत्रात काम करतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या स्वप्नाला आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना माझा पाठिंबा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्राचा शेवट करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले असून, एका सामान्य आणि बिगर-घराणेशाही पार्श्वभूमीच्या तरुण नेत्याला एवढा मोठा मंच दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार

0
मुंबई | Mumbai मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारस्कर मनोज जरांगेंविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता अजय बारस्कर यांनी थेट ईडीमध्ये जरांगेंविरुद्ध तक्रार केली असल्याची माहिती...