Saturday, May 4, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अजित पवारांची बदनामी - बावनकुळे

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अजित पवारांची बदनामी – बावनकुळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना महाविकास आघाडीचे नेतेच बदनाम करत आहेत, त्यांच्या विश्वासार्हतेवर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये केला.

- Advertisement -

नगरमध्ये आयोजित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शुक्रवारी नगरमध्ये आले होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार गेल्या तीन महिन्यात मला भेटले नाहीत, त्यांचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उद्योगपती अदानी यांची मैत्री खूप जुनी आहे. त्यांच्या मैत्रीकडे आम्ही मैत्री म्हणूनच पाहतो. मैत्री असल्यामुळे त्यांच्या गाठीभेटी होऊ शकतात. अजित पवार यांनी ममविआफचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपने प्रयत्न केला असा आरोप केला, त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, सरकार पाडण्यात आम्हाला रस नव्हता. आम्हाला काही देणेघेणे नव्हते. परंतु नैसर्गिक युती सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी विश्वासघात केला.

जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी कौल दिला होता. आमचे 162 आमदारही निवडून आले होते. परंतु मविआचे मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांना भेटत नव्हते. त्यांच्या आमदारांच्या पत्रावर अडीच वर्षे सह्या झाल्या नाहीत. त्यामुळे आमदार नाराजी व्यक्त करत होते. 75 टक्के आमदार नाराज होते. आमदारांना मातोश्री व मंत्रालयावर प्रवेश दिला जात नव्हता. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता एवढाच कार्यक्रम चालू होता. त्याचवेळी राष्ट्रवादीने 100 आमदार निवडून आणण्याची व ठाकरे यांचे आमदार कमी करण्याचे रणनीती तयार केली होती.

त्यामुळे ठाकरे यांच्याकडून आमदार निघून गेले व आमचे सरकार आले. उद्धव ठाकरे त्यांच्या आमदारांचा सन्मान राखू शकले नाहीत, म्हणून आमचे सरकार आले. बाजार समितीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर आहेत. त्या त्यामध्ये पक्षीय राजकारण नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाऊ शकतात, काही ठिकाणी आमची शक्ती अधिक असते तेथे आम्ही स्वतंत्र लढतो. काही ठिकाणी इतरांबरोबर सहकार्य घेतले जाऊ शकते, असेही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या नेतृत्वाच्या चुकीमुळे गेले आता पुन्हा त्याच उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व दिले गेले आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नेतृत्वाबद्दल भीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीमुळे आपण पुन्हा निवडून येऊ का नाही याबद्दल आमदारांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आता काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही उद्धव ठाकरे झाले आहेत आणि प्रवक्ते संजय राऊत झाले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रवक्ते शिल्लक राहिलेले नाहीत, असाही टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले याकडे लक्ष वेधले असता भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री होणे कोणाला आवडत नाही. परंतु संख्याबळाचा महत्त्वाचा मुद्दा असतो. तरीही त्यांना शुभेच्छा. परंतु 2024 मध्ये भाजप व शिवसेना युतीचे 200 हून अधिक जागा निवडून येतील, त्यामुळे अजित पवार यांनी स्वप्न पाहू नये.

विरोधी पक्षांनी समस्या मांडाव्यात

आरोप प्रत्यारोपांना महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. रोज सकाळी उठून त्यांची सुरुवात होते, ती सायंकाळपर्यंत चालते. लोकांना आता विकास हवा आहे. शेतकर्‍यांना गारपीटीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई हवी आहे, त्यामुळे आता विरोधी पक्षांने विकासावर बोलावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या