अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेसाठी शहरात सोमवारी (5 जानेवारी) भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त प्रचाराची सुरूवात झाली. मात्र या प्रचार दौर्यादरम्यान एक अनोखी व चर्चेची घटना घडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना तब्बल पाऊण तास हेलिपॅडवर थांबावे लागले. विशेष म्हणजे, हा विलंब कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर हेलिकॉप्टरच्या पायलटला अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीत अडकावे लागल्यामुळे झाला.
सोमवारी अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण उपस्थित होते. मात्र राज्यातील इतर ठिकाणी नियोजित सभा आणि कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी अहिल्यानगरमधील सभास्थळी अवघ्या दोन मिनिटांचे संक्षिप्त भाषण केले. त्यानंतर त्यांनी तातडीने पुढील दौर्यासाठी निघण्याची तयारी केली. सभेच्या ठिकाणाहून चव्हाण थेट हेलिपॅडकडे पोहोचले. मात्र यावेळी अनपेक्षित अडचण समोर आली. हेलिकॉप्टरचे पायलट जेवणासाठी बाहेर गेले होते.
परत येताना अहिल्यानगर शहरातील मुख्य मार्गांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पायलटला घेऊन येणारे वाहन अडकले. परिणामी, हेलिकॉप्टर उड्डाणासाठी आवश्यक असलेले पायलट वेळेवर पोहोचू शकले नाहीत. या घटनेमुळे चव्हाण यांना हेलिपॅडवर तब्बल पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली. हेलिपॅड परिसरात उपस्थित असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुरक्षादल यांच्यात या विलंबाबाबत चर्चा रंगली होती. अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अखेर पायलट हेलिपॅडवर पोहोचल्यानंतर उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि पाऊण तासाच्या विलंबानंतर चव्हाण यांचे हेलिकॉप्टर उडाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच शहरात चर्चेला उधाण आले असून, वाहतूक कोंडीचा फटका थेट राज्यस्तरीय नेत्यांनाही बसत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
राज्यात सर्वाधिक महापौर महायुतीचेच !
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा नगरमध्ये दावा
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात महापालिकांमध्ये जास्तीत जास्त महापौर युतीचेच होतील अशी शक्यता असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरमध्ये व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, नगर शहर स्मार्ट व्हावे, शहरात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर यावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देत असल्याने जनता महायुतीसोबत राहिल. चव्हाण यांच्या हस्ते नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप, महामंत्री वीजय चौधरी व रवींद्र अनासपुरे, निवडणूक प्रभारी आ. विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, या निवडणुकीत न भूतो ना भविष्यातील असे यश युती मिळवणार आहे. नगर शहराचा विस्तार होत असताना विकासही वेगाने होत आहे. उद्योग, व्यवसाय, रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
नगर शहर हे सुंदर व सुरक्षित भयमुक्त व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप व मी प्रयत्नशील आहोत. यावेळी युतीचे बिनविरोध निवडून आलेल्या पाची नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. तसेच पालकमंत्री विखे यांचा सत्कार माजी महापौर भगवान फुलसौंदर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केला.





