कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी चारपाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड हे कुंभेफळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आरोपींसोबत जमिनीच्या व्यवहारावरून व कौटुंबिक कारणांमुळे वाद सुरू होता. फिर्यादीनुसार, 27 जून रोजी सकाळी फिर्यादी आपल्या अल्पवयीन मुलीसह शेतात असताना चारपाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड हे हातात तलवार घेऊन तेथे आले. त्यांच्यासोबत भाऊसाहेब धोदाड यांच्यासह इतर आरोपीही काठ्या घेऊन आले होते.
यावेळी जमिनीच्या वादावरून शिवीगाळ करत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भाऊसाहेब धोदाड व धीरज धोदाड यांनी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलीशी तिच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे वर्तन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आल्याने संबंधितांची सुटका झाली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चारपाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड, भाऊसाहेब धोदाड, सूरज धोदाड, धीरज धोदाड, वैशाली धोदाड आणि अश्विनी धोदाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.




