नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.
२०१४ साली देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह विराजमान झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले. पक्षातील अंतर्गत सूत्राने सांगितले की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. पक्षात त्यांना एक चांगला वक्ता म्हणून ओळख मिळाली. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपातील चार महत्त्वाची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.
ही नावे आहे चर्चेत
भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नड्डा यांनी भाजपा आता स्वयंपूर्ण असून पक्षाला पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नाही असे विधान केले होते, ज्यामुळे भाजपा आणि आरएसएसमधील मतभेद उघड झाले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा ३०३ वरून २४२ पर्यंत घसरल्या. विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिल्यानंतर मागसवर्गीय समुदायातील मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा