अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भाजपाचे केडगाव मंडल अध्यक्ष नीलेश भाऊसाहेब सातपुते (वय 38 रा. सातपुते चौक, केडगाव) यांच्यावर लोखंडी टामी, लाठ्या-काठ्याने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र मोहन पठारे (वय 43 रा. भूषणनगर, केडगाव) असे त्याचे नाव आहे. अवैध बांधकामाबाबत प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून 17 जणांच्या टोळक्याने नीलेश सातपुते यांच्यावर हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 17 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत. त्यातील राजेंद्र पठारे हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती अहिल्यानगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मंगळवारी (8 ऑक्टोबर) मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, गणेश चव्हाण यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने राजेंद्र पठारे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात विजय मोहन पठारे, प्रशांत बारस्कर, अजय राजू पठारे, विजय राजू पठारे, आकाश औटी, मयुर चावरे, सनी भुजबळ, राहुल झेंडे, गितेश ऊर्फ भैया पवार, राकेश ठोकळ, परशुराम बुचाळे, सोनू परदेशी, आकाश सांगळे, विशाल दळवी, अंशु चव्हाण, अजय बुचाळे (पूर्ण नाव, पत्ता नाही) हे सर्व संशयित आरोपी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.