मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने आतापासून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून या निवडणूक तयारीचा भाग म्हणून आज, रविवारपासून मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ‘आशीर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा भाजप आणि शिवसेना अशी दोन्ही पक्षांची राहणार आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीने मुंबईतील सहाही लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. आगामी निवडणुकीत या यशाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या निर्धाराला कृतीची जोड म्हणून आजपासून मुंबईत आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊनन जात आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजप आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. दीड-दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा संपन्न होतील, शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल, असेही त्यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवर जाणता राजाचे प्रयोग
दरम्यान, आशीष शेलार यांच्या पुढाकाराने दादरच्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणारे, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याची सहा प्रयोगांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. १४ मार्च ते १९ मार्च या कालावधीत रोज संध्याकाळी ६:४५ वाजता या नाटकाचा प्रयोग होईल.
या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परळ आदी ठिकाणी ९ मार्चपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोज सुमारे १० हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.