धुळे – राज्याचे माजी पर्यटनमंत्री आ.जयकुमार रावल यांची महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, काल दि.3 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची प्रदेश कार्यकारीणी जाहिर केली.त्यात आ.रावल यांची निवड झाली.
25 व्या वर्षी नगरसेवक पदापासून राजकारणाची सुरवात करणारे आ.रावल हे यापूर्वी भाजयुमोच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून देखील काम केले होते, त्यावेळी त्यांच्याकडे कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यांची जबाबदारी होती. एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांच्या कार्यकारीणीत देखील आ.रावल हे महामंत्री होते.
धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. सन 2004 पासून ते सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले असून मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्ट्राचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते.
त्यांचे शिक्षण पंचगणी, मुंबई, पुणे आणि यु.के.मधील कार्डीफ युनिर्व्हसिटीमध्ये झालेले आहे. त्यांना मोठा पारीवारीक वारसा असून त्यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते. तर त्यांना ऐतिहासिक वारसा देखील लाभला असून ते खान्देशातील राऊळ या संस्थानिक कुटुंबातून येतात.
विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर त्यांनी युथ फोरम या सर्वपक्षीय तरूण आमदारांची संघटना देखील स्थापन केली होती. त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रणिती शिंदे, पंकज भुजबळ यांच्यासारखे दिग्गज तरूण नेत्यांचा समावेश होता.