मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या अपयशाची कारणे शोधण्यासाठी भाजपा महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लोकसभेतील पराभूत झालेल्या जागांवर विचार विनिमय करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. कुणीही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने काम सुरू केले आहे. मोदीजींच्या अभिनंदनाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाबद्दल ठराव मांडण्यात आला. गरीब कल्याणाच्या योजना तळागळात पोहोचविण्यासाठी भाजप काम करत आहे. तसेच, नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. महायुतीचे उमेदवार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आजची बैठक पार पडली अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नरेटिव्ह खोडून काढा. काल परवा महाराष्ट्राला कमी निधी असा नरेटिव्ह आला. खरे तर आधी महाराष्ट्राला 5.1% टक्के निधी मिळायचा, आता 6.3% मिळतो. त्याच्या वाटपाचे निकष वित्त आयोग ठरवते. वक्फ बोर्डाला १० कोटी निधी असा नरेटिव्ह तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात फक्त २ कोटी देण्यात आला आहे. बीडीडी चाळीतील लॉटरी काढली नाही, असा नरेटिव्ह केला. ती २० मे रोजीच होती. पण मतदान असल्याने पुढे ढकलली गेली. ती होणारच आहे. स्मार्ट मीटर लावणार असा नरेटिव्ह, प्रत्यक्षात असा निर्णय नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वस्त केले की आपली संघटना महाराष्ट्रातील जनतेला मविआच्या मायावी शक्तीतून, खोट्या नरेटिव्हमधून बाहेर काढणार आहे. मोदींनी संविधान सर्वोच्च असल्याचे अधोरेखित केले आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निर्माण केलेले भय दूर करण्याचे काम मोदींजींनी केले. आम्ही आदिवासी, मागास लोकांमध्ये जाणार आहोत. महिलांना खटाखट पैसे देऊ असे काँग्रेसने म्हटले होते. पण, जनतेचा कौल मान्य आहे. पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू. राज्यात घरोघरी जाणे, नवमतदारांची नोंदणी, संभ्रमीत झालेल्या जनतेचा संभ्रम दूर करु अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, आता काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तिथेही महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मेगाप्लान तयार केला आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. निरीक्षक या मतदारसंघातील जनतेची मतं जाणून घेणार आहेत, त्यात मराठा समाजचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघाचीही समावेश आहे. याचा अहवाल तयार करून वरिष्ठाना पाठवण्यात येणार असून त्यादृष्टीने विधानेसभा निवडणुकांचं काम केलं जाणार आहे.