Saturday, May 4, 2024
Homeनगरऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास प्रशासन जबाबदार

ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास प्रशासन जबाबदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एरव्ही तीनशे रुपयांना मिळणारा ऑक्सिजन सिलेंडर आता थेट पाचशे रुपयांपर्यंत जावून पोहोचला आहे.

- Advertisement -

इतकी किंमत मोजूनही ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन अभावी एखाद्या रुग्णांचा मृत्यू झाला तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने दिला. तसे पत्र थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत धाडण्यात आले आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यातील अनेकांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र व्हेंडरकडून तुटवडा असल्याचे सांगत गॅसचे भाव दुपट्टी झाले आहेत. एरव्ही 6 ते 7 हजार लिटरचा ऑक्सिजन सिलेंडर तीनशे-सव्वातीनशे रुपयांना मिळत, आता तोच सिलेंडर पाचशे-सव्वापाचशे रुपयांना मिळत आहे.

करोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली. ऑक्सिजनची वितरण व्यवस्था फोल ठरली आहे. बाजारात मागणी व पुरवठ्याचे गणित जुळत नसल्याने सिलेंडरचे भाव वाढले आहेत. जिल्हा प्रशासनाशी यासंदर्भात वेळोवेळी चर्चा झाली. 15 ऑगस्टला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशीही चर्चा झाली.

मात्र परिस्थिती काही सुधारली नाही. व्यापार्‍यांनी ऑक्सिजनचे भाव वाढवित काळाबाजार सुरू केल्याचा थेट आरोप आयएमए संघटनेने केला आहे. तशी तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आली आहे.

एकीकडे बाधित रुग्णाला अ‍ॅडमीट करून घ्या. त्याच्यावर उपचार करा असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जाते. तर दुसरीकडे रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली तर त्याचा तुटवडा. खासगी डॉक्टर दुहेरी पेचात सापडले आहेत.

एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यास त्यास डॉक्टर, हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल असे थेट पत्रच संघटनेचे जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी दिली.

खा. सुळे अन् आरोग्य सचिवांशी चर्चा

खासदार सुप्रिय सुळे यांच्याकडे डॉक्टरांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भातील तक्रार केली. त्यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आदेश देतानाच डॉक्टरांनाही दिलासा दिला. आरोग्य विभागाचे सचिव खर्गे यांच्याशीही आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांचे बोलणे झाले. त्यानंतर प्रशासनात हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली.

अन् प्रशासनाला जाग आली

खासगी डॉक्टरांनी तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयात केली. त्यानंतर प्रशासकीय हालचाली गतीमान झाल्या. ऑक्सिजना पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्रीच त्याचे आदेशही निघाले. निवासी उपजिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष तर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त हे सचिव असून जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक, सिव्हील सर्जन व आरटीओ या समितीचे सदस्य असणार आहेत. ही समिती जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी व पुरवठा याचे समन्वय करणार असल्याचे सांगण्यात आले.

खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना दोष दिला जातो. प्रशासन चांगले काम करते, पण ऑक्सिजनचे व्यवस्थापन योग्यरित्या होत नाही. कोणाबद्दल तक्रार नाही, पण उद्या काही विपरित घडले तर डॉक्टरांच्या अंगलट यायला नको, त्यामुळे ही भूमिका घेतली.

– डॉ. अनिल आठरे, अध्यक्ष आयएमए.

- Advertisment -

ताज्या बातम्या