Thursday, May 23, 2024
Homeनगरकाळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा गहू पकडला

काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा गहू पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेशनिंगचा 40 पोते गहू काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेला टेम्पो कोतवाली पोलिसांनी कायनेटीक चौकात पकडला. गहू, टेम्पोसह दोन लाख 52 हजार 600 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक लक्ष्मण अनिल कासार (वय 20 रा. देवळगाव रस्ता, वाळकी, ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगर- दौंड रस्त्याने दौंडवरून एक विना नंबरचा टेम्पो शासकीय योजनेतील रेशनिंगचा गहू घेऊन येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मंगळवारी (दि. 11) मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, इनामदार, सोमनाथ राऊत, संदीप थोरात यांना कायनेटीक चौकात सापळा लावून पंचासमक्ष कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. पथकाने कायनेटीक चौकात सापळा लावला असता बातमीनुसार माहिती मिळालेला विना नंबरचा टेम्पो पोलिसांनी कायनेटीक चौकात पकडला. टेम्पो चालकाने त्याचे नाव लक्ष्मण अनिल कासार असे सांगितले. टेम्पोमध्ये मका असल्याचेही त्याने सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सदर टेम्पोची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये 40 हजार रुपये किमतीचा 40 पोते गहू, अन्न धान्याचे बारदाणे, दोन गाडीच्या नंबर प्लेटा, एक पोते मका, एक पोते ज्वारी, एक पोते एरंड व चार पोते हरभरा असा मुद्देमाल मिळून आला. लक्ष्मण कासार याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गहू कुठून आणला याबाबत त्याने काही एक न सांगता उडवाउडवीची उत्तरे दिली. धान्य, टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेत कासार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यादव अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या