Sunday, May 26, 2024
Homeनगर3 हजार 722 बीएलओ देणार आजपासून घरोघरी भेटी

3 हजार 722 बीएलओ देणार आजपासून घरोघरी भेटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि.21) 3 हजार 722 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारयादीत आपले नाव नोंदवा, मतदार व्हा, या कार्यक्रमासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानापासून वंचित राहिलेल्या व नवमतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे आणि दोषरहित मतदार यादी तयार करणे, हा या मागचा उद्देश आहे. यासाठी महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील 3 हजार 722 (बीएलओ) घरोघरी भेटी देणार आहेत. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रित प्रारुप मतदार प्रसिध्द करणेत येणार आहे.

यादी प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना 6 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा. ज्या व्यक्तीचे नाव मतदारयादीत नाहीत, तसेच ज्या व्यक्तीचे 1 जानेवारी 2024 रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदारयादीत नाव नाही, अशा व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना 6 भरुन द्यावा. जिल्ह्यातमतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत. अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नाव कायम ठेवून उर्वरीत ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना 7 भरुन द्यावा.

मतदाराचे जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास, त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नांवाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. आगामी लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्राची तपासणी व सुसुत्रीकरण करण्यात येत आहे. एका मतदान केंद्रात 1 हजार 500 पेक्षा जास्त मतदार झाल्यास लगतच्या मतदान केंद्रात मतदार समाविष्ट करणे किंवा नविन मतदान केंद्र प्रस्तावित करणे, मतदान केंद्राचे इमारतीचे नाव बदलले असल्यास मतदान केद्राच्या नावात बदलबाबत प्रस्ताव केला जाईल.

तसेच जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांची नांव नोंदणी वाढविणेसाठी महाविद्यालस्तरावर मोहीम राबवली जाणार आहे. मतदारांनी आपले नाव 17 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार्‍या प्रारुप मतदारयादीत समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करावी. जर या मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास आवश्यक पुराव्यासह फॉर्म भरुन तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रात किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा, असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या