Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगBlog # मोठेभाऊंच्या आश्रयाधाराने अमेरिकेत डॉ.अजित गोयनका यांचे कॅन्सरवर संशोधन

Blog # मोठेभाऊंच्या आश्रयाधाराने अमेरिकेत डॉ.अजित गोयनका यांचे कॅन्सरवर संशोधन

श्रद्धेय मोठेभाऊ तथा आ.भवरलालजी जैन यांचा आज श्रद्धावंदनदिन. आ.मोठेभाऊंच्या स्मृतीस वंदन करीत असताना त्यांच्या दातृत्वातून आयुष्य साकारलेल्या आणि सध्या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मेयो क्लिनिकच्या निदान (डायग्नोस्टिक) विभागातील अनुभवी, ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट आणि कॅन्सर निदान व उपचाराचे अभ्यासक डॉ. अजीत हरिशकुमार गोयनका यांच्या यशस्वी जीवन प्रवासाची कहाणी समोर येते. आ.मोठेभाऊ यांच्या दातृत्वातून अनेकांचे आयुष्य सावरले आणि आकाराला आले. काहींचे कार्य भारतासह परदेशातही विस्तारले. अशा गुणात्मक व मोजक्या विशेष व्यक्तींमध्ये जळगाव येथील गोयनका कुटुंबातील डॉ.अजीत यांचा प्रवास लक्ष वेधतो आणि इतरांना पथदर्शक प्रेरणा देतो.

डॉ.गोयनका हे सध्या अमेरिकेतील मेयो क्लिनिकमध्ये कॅन्सरच्या लवकर निदानासाठी रेडिओलॉजी पध्दतीचा वापर कसा करता येईल? यावर प्रयोग आणि संशोधन करीत आहेत. मेयो क्लिनिकला जगातील क्रमांक एकचे रूग्णालय म्हणून जगन्मान्य आहे. या रुग्णालयात अल्पावधीतच डॉ.गोयनका यांनी विविध कार्यप्रणालीत नेतृत्वाची विविध पदे स्वीकारली आहेत. बहुतेेक रूग्णांमध्ये कॅन्सरचे निदान हे उशिराने होते. दुसर्‍या किंवा तिसर्‍या पायरीपर्यंंत आजार बळकावलेला असताना किरण (लेसर) उपचार त्रासाचे ठरतात. उपचाराच्या वेदना आणि आजाराच्या विषाणुंमुळे शरीराला आलेला जर्जरपणा यातून रुग्णाला आयुष्य नकोसे होते. हे वास्तव लक्षात घेऊन डॉ.गोयनका हे स्वादुपिंडाला झालेल्या कॅन्सरचे निदान लवकर करता यावे म्हणून नवीन रेडिओट्रेसर चाचणीवर संशोधन करीत आहेत. याकरिता त्यांनी स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) वा एमआरआय पद्धतीचा वापर केला आहे. रेडिओलॉजिकल स्क्रीनिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सकारात्मक परिणाम दाखवतो आहे. अमेरिकन सरकार आणि संरक्षण विभागाकडून डॉ.गोयनका यांच्या संशोधन कार्याला लाखो डॉलर्सचा निधी दिला जात आहे. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या नवकल्पनांसाठी डॉ.गोयनका यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातून अमेरिकेतील मेयो क्लिनिकमध्ये पोहचलेल्या डॉ.अजीत गोयनका यांच्या कहाणीत श्रद्धेय मोठेभाऊ हे त्यांच्यासाठी आश्रयदाते आणि आधारवड झाल्याचा उल्लेख वारंवार येतो. डॉ. गोयनका नुकतेच जळगावला आले होते. त्यांच्याशी बोलताना, मोठेभाऊंची दूरदृष्टी, दातृत्व, समुपदेशन, प्रेरणा, संपर्क, सातत्य आणि उत्तमतेकडून अती उत्तमतेकडे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन देणे अशा विविध गुणांचा भरभरून उल्लेख डॉ. अजीत यांनी आदराने केला. डॉ. अजीत हे भारतात शिक्षण घेत असताना त्यांच्या मोठेभाऊंशी प्रत्यक्ष भेटी आणि बोलणे होत असे. डॉ.अजीत हे वैद्यकिय शिक्षण व पुढील संशोधनासाठी विदेशात गेल्यानंतर त्यांचा मोठेभाऊंशी इ मेलवरही पत्र संवाद होत असे. या पत्रातील आशय आजही इतर तरुणांना प्रेरणा देणारा ठरला आहे. मोठेभाऊंनी डॉ.अजीत यांचे पालकत्व कशा प्रकारे स्वीकारले? त्याचा क्रमशः उल्लेख रंजक आहे. डॉ.गोयनका यांचे वडिल हरिशकुमार, आई सीतादेवी, लहान बहिण आंचल आणि स्वतः अजीत हे सन 1996 च्या सुमारास अकोला येथून जळगावला आले. हरिशकुमार हे कारखाने वा संस्थांसाठी हिशोबाची कामे करीत. अकोला येथे त्यांना फारसे काम मिळाले नाही. समाधानकारक रोजगारासाठी ते जळगावला आले. येथील एका दाल मीलमध्ये त्यांना लेखापालाचे काम मिळाले. चौघे जण एका भाड्याच्या खोलीत राहत असत. हरिशकुमार यांचे वेतनावर कसे-बसे भागत असे. अजीत हे अभ्यासात हुशार होते. ते शालेय वर्गात प्रथम येत. अजीत यांनी डॉक्टर व्हावे असे हरिशकुमार यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी अजीत यांना सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये प्रवेश दिला. एकाच खोलीत एका कोपर्‍यात अजीत अभ्यास करीत असे. सन 1999 मध्ये दहावीचा नाशिक परीक्षा मंडळाचा निकाल जाहिर झाला. गुणवत्ता यादीत जळगावचे अजीत गोयनका हे सर्व प्रथम आल्याचे जाहिर झाले. हा निकाल अनपेक्षित होता. अती सामान्य कुटुंबातील मुलाने मिळविलेले हे यश तेव्हाच्या माध्यमांमध्ये कौतुकास्पद ठरले.

रोटरीक्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा एक कार्यक्रम मोठेभाऊंच्या हस्ते झाला. तेथे अजीत यांची पहिली भेट मोठेभाऊंशी झाली. त्यांना अजीत यांच्या गुणवत्ता व कौटुंबिक पार्श्वभूमिविषयी इतरांकडून समजले. त्यांनी अजीतला सांगितले, मला येऊ भेट. पुढील रविवारी मोठेभाऊ सकाळी नेहमीच्या फिरस्तीवर असताना अजीत त्यांच्या सोबत होते. मोठेभाऊंनी त्यांची सविस्तर चौकशी केला. डॉक्टर होण्याची इच्छा अजीत यांनी व्यक्त केली. मोठेभाऊ म्हणाले, ठिक आहे. तुझ्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. त्यानंतर अजीत हे मोठेभाऊंच्या संपर्कात आले आणि वारंवारच्या भेटीतून विस्तारित जैन कुटुंबाचे सदस्य झाले. सन 2001 मध्ये बारावीचे वर्ष होते. अजीत यांच्यासाठी परीक्षा महत्त्वाची होती. मोठेभाऊंनी गोयनका कुटुंबाला म्हाडा कॉलीतील स्वमालकीचे घर दिले. तेथे स्वतंत्र खोलीत अजीत यांच्या अभ्यासाची सोय झाली. या परिक्षेतही अजीत नाशिक परीक्षा मंडळात प्रथम आले. या नंतर वैद्याकिय शिक्षणाच्या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागली. या परिक्षेतही अजीत हे दुसरे आले. यापुढील वैद्यकिय शिक्षणाचा खर्च वाढणार होता. त्याची जबाबदारी मोठेभाऊंनी स्वीकारली. खरेतर तेव्हा मोठेभाऊंचा उद्योग समुह सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करीत होता. अजीत यांना मुंबईतील सरकारी महाविद्यालयात (केईएम) प्रवेश मिळाला. तेथील वसतीगृहात अभ्यास होणार नाही म्हणून मोठेभाऊंनी अजीत यांच्या निवासाची व्यवस्था उद्योग समुहाच्या गेस्टहाऊसमध्ये स्वतंत्र खोलीत केली. याच काळात आंचल ही सुद्धा एमएससी बायोटेकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाली. दोघांच्या शिक्षणाचा खर्च मोठेभाऊंनी स्वीकारला. याच प्रवासात जैन परिवारातील अशोकभाऊ, अनिलभाऊ, अजीतभाऊ यांच्या संपर्कात अजीत आले.

एमबीबीएस पूर्ण झाल्यांतर एमडीला रेडिओलॉजी विषयासाठी प्रवेशित होण्याचे ठरले. नवीदिल्लीतील एआयएमएसमध्ये प्रवेश हवा होता. तेथे केवळ 50 जागा होत्या. त्यासाठी संपूर्ण भारतातून प्रवेश परीक्षा झाली. या परीक्षेत अजीत यांनी पहिला क्रमांक मिळविला. यावेळी मोठेभाऊ अमेरिकेत होते. त्यांच्या हृदयावर पहिली बायपास शस्त्रक्रिया झालेली होती. त्यांना अजीत यांच्या यशाचे वृत्त समजले. त्यांनी तेथून दूरध्वनीवर अजीत यांचे अभिनंद केले. त्या पुढील उच्च शिक्षण रेडिओलॉजी याच विषयात करण्यासाठी जर्मन सायन्स फाऊंडेशची शिष्यवृत्ती मिळाली. जर्मनीत प्रशिक्षण झाले. नंंतर तीन वर्षे नवीदिल्लीत रेडिओलॉजीचा अभ्यास करीत एआयएमएसमध्ये सेवा दिली. यापुढील डॉ.अजीत यांचा प्रवास अभ्यासातून संशोधनाकडे सुरु झाला. अमेरिकन शिष्यवृत्ती मिळाली. तेथील प्रसिद्ध रुग्णालये आणि संशोधन संस्थामध्ये बोलावणे आले. सन 2015 मध्ये मेयो क्लिनिकमध्ये कॅन्सरवरील संशोधनाचे काम सुरु झाले. ते आज निष्कर्षापर्यंत पोहचते आहे. या काळात अजीत यांचे लग्न नायला यांच्याशी ठरले. मोठेभाऊंनी वधु निश्चितीपूर्वी नायला यांना जैन परिवारात तीन दिवसांसाठी मुक्कामी बोलावले. त्यांनी नायला यांच्याशी बोलून व निरीक्षण करू लग्न निश्चितीला संमती दिली. डॉ.गोयका यांना आज रिषिक व रेयान ही दोन अपत्ये आहेत.

मोठेभाऊ यांच्याशी डॉ.अजीत सतत संपर्कात होते. सन 2016 मध्ये मोठेभाऊंचे निधन झाले. त्याअगोदर मोठभाऊ व डॉ.अजीत यांचा इ मेलवरील पत्र संवाद विस्तारला. जेव्हा प्रत्यक्ष भेटी झाल्या तेव्हाही बोलणे झाले. श्रद्धेय मोठेभाऊंनी डॉ.अजीत यांना कानमंत्र दिला. मोठेभाऊ म्हणाले, स्वतःसाठी हवे तेवढे उच्च शिक्षण घे. संशोधन कार्य पूर्ण कर. पण पुढील काळात त्याचा देशासाठी वापर कर. जेव्हा संधी मिळेल तेव्हा देशात परत ये. आज डॉ.अजीत हे सुद्धा याच कानमंत्रावर विचार करीत आहेत. भारतात परत येऊन कॅन्सरवरील कमीत कमी खर्चाचा व पुढील संशोधासाठी आवश्यक त्या खर्चात रुग्णांना उपचाराची अद्ययावत सेवा देण्याचा त्यांंचा प्रयत्न आहे. या संदर्भात अशोकभाऊ व इतरांशी त्यांची चर्चा सुरु आहे. जैन उद्योग समुह सुद्धा आरोग्य क्षेत्रात विविध सेवा विस्तारत आहे. बहुधा भविष्यात डॉ.अजीत यांचा तसा काही योग जुळून येऊ शकतो.

आज मोठेभाऊंच्या स्मृतींना उजाळा देत असता डॉ.अजीत गोयनका यांची ही कहाणी इतरांना प्रेरणा देणारी ठरते. त्यातून मोठेभाऊंच्या कार्यशैलीची प्रचिती येते. त्यांच्या पवित्र-पावन स्मृतीस श्रद्धापूर्वक वंदन.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या