Saturday, March 29, 2025
Homeब्लॉगकुशल संघटकः डॉ. हेडगेवार

कुशल संघटकः डॉ. हेडगेवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचा गुढीपाडवा या शताब्दी वर्षातील आहे. गुढीपाडवा हा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने डॉ. हेडगेवार यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्माला १३६ वर्षे झाली आहेत. त्यांचा जन्म १८८९ पाडव्याचा. सामान्यपणे कर्तबगार व्यक्तीसुध्दा ह्या कालावधीत विस्मृतीच्या पडद्याआड गेलेली असते. पण डॉ. हेडगेवार हे काही वेगळेच रसायन आहे. त्यांच्या मृत्युला सुध्दा ८५ वर्षे झाली आहेत. मी लहान असताना डॉ. हेडगेवार यांना पाहिले होते असे म्हणू शकणारी एखाददुसरी व्यक्ती सुध्दा आज नव्वदीच्या पुढे पाहिजे. असे असूनही आजसुद्धा डॉ हेडगेवार यांचे नाव, चरित्र, आठवणी आणि मार्गदर्शन कोट्यवधी जनतेला माहिती आहे. त्या मार्गाने चालणारी अशीच लाखोंच्या संख्येत कार्यकर्ते मंडळी आहेत की, ज्यांना जग स्वयंसेवक म्हणून ओळखते.

- Advertisement -

अशा डॉ. हेडगेवार यांचे स्मरण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे की, आज जे डॉ. हेडगेवार हे नाव सर्वदूर आदराने परिचित आहे ते त्यांच्या मृत्यू समयी काही फार थोड्या लोकांना परिचित होते. मग असे काय घडले की, प्रत्यक्ष कार्यरत असतानाचे डॉ. हेडगेवार अपरिचित होते आणि आज मृत्यूनंतर ८५ वर्षांनी ते सर्वदूर परिचित आहेत. या कोड्याची उकल म्हणजे डॉ. हेडगेवार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणविशेषाचा परिचय होय.

सामान्यपणे चांगल्या व्यक्तींमध्ये जे गुण असतात ते सर्व डॉ. हेडगेवार यांच्यात होतेच, पण म्हणून ते डॉ. हेडगेवार झाले नाहीत. तर ते डॉ. हेडगेवार ज्या गुणांमुळे झाले ते गुण अभ्यासणे आवश्यक आहे. समाज संघटनेच्या कार्यासाठी कोणते गुण लागतात आणि ते कसे अंगीकारले जातात हे समाजाला माहिती नव्हते त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी ते प्रत्यक्षात उतरवून दाखवले.

अहंकार नाही, ध्येय महत्त्वाचे
काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात होते आणि लोकमान्य टिळक त्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्हावेत असा नागपूर काँग्रेसचा खूप आग्रह होता. पण लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले आणि अधिवेशनासाठी नवीन अध्यक्ष निवडणे गरजेचे झाले. जहाल गटाचे अध्यक्ष व्हावेत म्हणून डॉ. हेडगेवार हे डॉ. मुंजे यांच्या बरोबर पाँडेचरीला योगी अरविंद यांना विनंती करण्यासाठी गेले की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे. पण योगी अरविंद यांनी नकार दिल्याने ते प्रयत्न थांबले. हा प्रसंग संपला. पण डॉ. हेडगेवार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेचा पैलू येथे दिसला. या अधिवेशनाचे डॉ. हेडगेवार हे कार्यकर्ता दलाचे प्रमुख होते आणि ते अधिवेशन व्यवस्था म्हणून उत्कृष्ट ठरले. डॉ. हेडगेवार यांच्या मनासारखे अध्यक्ष निवडीत घडले नव्हते तरीही त्याचा परिणाम डॉ. हेडगेवार यांनी कामावर होऊ दिला नाही. माझा अहंकार नाही तर माझे ध्येय महत्त्वाचे म्हणून अधिवेशन यशस्वी करूनच डॉ. हेडगेवार थांबले. संघटन करायचे असेल तर मी, माझे याला मुरड घालावी लागेल आणि डॉ. हेडगेवार यांनी ती घालून दाखवली. म्हणून डॉ. हेडगेवार हे आजही जन सामान्यांना परिचित राहिले.

स्वतःला बदलवले
संघटक ही अशी तारेवरची कसरत आहे की त्यात व्यक्तिमत्त्व विलय ही पूर्व अट असते. डॉ. हेडगेवार यांनी ती अट लीलया स्वीकारली होती. नागपुरासह सर्वत्र त्यांची यथेच्छ निंदा नालस्ती होत असे. पण त्याला ते प्रत्युत्तर देत बसले नाहीत. त्यांना गवारों के हेड असेही म्हटले गेले. डॉ. हेडगेवार यांनी स्वतःला बदललले म्हणून जगाला आश्चर्यचकित करणारे संघटन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा राहिला.

संघटकाला आणखी एका तरल गुणाची आवश्यकता असते. ती म्हणजे उद्दिष्ट काय आहे? हे पक्के माहीत असावे लागते. कारण ते उद्दिष्ट सहज दिसणारे नसते आणि लोकांना पहिल्याच दिवशी ते स्पष्ट करता येत नसते. त्यामुळे प्रमुखाला ते नीट माहिती असावे लागते. येथे डॉ. हेडगेवार हे समजून घेणे फार गरजेचे आहे.

हिंदू समाज संघटनेचे कार्य
डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला आणि त्याचे उद्दिष्ट होते, हिंदू समाज संघटित करून आपल्या देशाला परम वैभवाला न्यायचे. हिंदू समाज संघटित करणे हे उद्दिष्ट. अशा अवघड परिस्थितीत त्यांनी संघाची कार्यपद्धती अशी विकसित केली की, साऱ्या हिंदू समाजाचे संघटन संघ करू शकला. म्हणून आज संघटित हिंदू समाज दिसत आहे.

माझे काम समाज संघटित करून ध्येयधुंद बनवणे आहे. मी बदनाम होईन, ते चालेल पण संघटकाच्या मर्यादेत राहीन. असा १९२५ ते १९४० पर्यंतचा प्रवास त्यांनी केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रव्यापी बनवला. त्या संघाने मग समाजातील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली. डॉ. हेडगेवार हे लोकांच्या स्मरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ध्येयरूपात राहिले. संघटक डॉ. हेडगेवार यांना हिंदू समाज संघटित करण्यासाठी काही आधार ठरविणे भाग होते. कारण संघटकाला ज्या उद्देशाने संघटन करायचे आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी तसा ध्येयवाद द्यावा लागतो. हिंदू समाज संघटित करायचा आहे पण त्याचा हेतू आहे देशाचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याची पूर्व अट आहे, ‘स्व’विषयी स्वाभिमान. त्यामुळे हिंदू समाजाला आपला इतिहास, पूर्वज, तत्वज्ञान या विषयी सार्थ अभिमान असला पाहिजे तरच तो समाज विजयाकांक्षी होऊ शकतो. त्यामुळे समाजात वरवर दिसणारे दोष पहात आत्मश्लाघा करत रहायचे कि विजुगिशीवृत्ती जागवून आत्मभान असलेला समाज उभा करायचा यातील एक मार्ग निवडायचा होता. संघटक डॉ.हेडगेवार यांनी दुसरा मार्ग निवडला आणि तो किती अचूक होता हे आज स्पष्टपणे लक्षात येते. त्यामुळे ध्येयरूप डॉ. हेडगेवार संघाच्या रूपाने, संघाच्या कार्यातून आज आपणामध्ये वावरत आहेत.

डॉ. हेडगेवार यांच्या वैयक्तिक गुणांविषयी खूप विस्ताराने लिहिता येईल. पण संघटक या शब्दाला कोणते विशेष गुण लागतात आणि ते डॉ. हेडगेवार यांनी कसे आत्मसात केले होते आणि समाजात संघ रूपाने कसे उतरवले हे त्यांचे जगावेगळे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे.

सुनील देशपांडे
(लेखक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पूर्व प्रचारक आहेत.)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; ‘या’ तारखेपासून वीज...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर वीजेच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. येत्या एक एप्रिलपासून...