नदी म्हणजे फक्त पाण्याचा वाहता प्रवाह नाही. निसर्ग, मानव, संस्कृती, परंपरा या सार्यांची ती जीवनरेखा असते. नद्यांच्या काठावर वने बहरतात, माणसं स्थिरावतात, वस्त्या-नगर वसतात , संस्कृती उदयाला येते आणि नगराची, तिथल्या माणसाची, त्यांच्या संस्कृतीची ती नदी अविभाज्य भाग बनते. जेव्हा अशी नदी गोदावरी असते आणि तुम्ही तिच्या काठावरचे नाशिककर असतात तेव्हा हे नाते अगदी जवळून अनुभवता येते. नाशिककर जीवनातले सगळे क्षण गोदमाईच्या साक्षीने जगतात. आपल्या जीवनदायिनीचा जन्मोत्सव सुद्धा भक्तिभावाने साजरा करतात…
गोदामाई पृथ्वीवर कधी अवतरली याबद्दल ब्रह्मपुराणात म्हटले आहे की, गौतमऋषींनी अजाणतेपाणी झालेल्या गोहत्येच्या पातकाच्या मुक्ततेसाठी भगवान शिवांचे कठोर तप केले आणि प्रसन्न झालेल्या शिवांकडून जटेतील गंगा मागितली. भगवान शंकराने गौतमऋषींना आशीर्वाद देत गंगेला ब्रह्मगिरी पर्वतावर प्रकट केले.
‘कृते लक्षद्वयातीते मान्धातरि शके सति ।
कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पतौ ॥
माघशुक्लदशम्यां च मध्यान्हेे सौम्यवासरे ।
समागता भूमौ गौतम सति ॥
महापापादियुक्तानां जनानां पावनाय च ।
औदुम्बरतरोर्मूले ययौ तदा ॥
कृतयुगाची दोन लाख वर्षे झाल्यानंतर जेव्हा मांधाता राजाचा संवत चालू होता, तेव्हा कूर्म अवतारात, गुरु सिंह राशीत असताना ब्रह्मगिरी पर्वतावर गौतमऋषींच्या आश्रमात औदुंबर वृक्षाच्या मुळाशी माघ शुक्ल दशमीला मध्यान्हकाली गोदावरी भूलोकी अवतीर्ण झाली.
गौतमस्य गवे जीवनं ददाति इति गोदा।
गौतमऋषींच्या स्पर्शाने मृत झालेल्या गायीस जीवन देणारी, ती ‘गोदा’ होय. किंवा शब्दकल्पद्रुम नुसार
‘गां स्वर्गं ददाति स्नानेन इति गोदा ।
जिच्या स्नानाने स्वर्ग होतो, ती ‘गोदा’.
व्युत्पत्ती काहीही असो गोदावरी इहलोकीच स्वर्गसुख प्रदान करते. ‘पुरुषार्थचिंतामणि’ या ग्रंथानुसार गोदावरी ही आद्य गंगा आहे. जान्हवी गंगा ही तिच्यानंतर आली आहे. ‘आद्या सा गौतमी गगा। द्वितीया जान्हवी स्मृता
भारतात तिला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. आम्हा नाशिककरांना गौतमी गंगाच कांकणभर अधिक प्रिय. म्हणून तर नाशिककर हिला कायम गंगा असंच म्हणतात. त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वार इथे उगम पाऊन गोदा कुशावर्तात प्रगट होते. पुढे गंगापूर वरून पात्र विस्तारत सोमेश्वरला खाली कोसळते आणि नाशिक मध्ये पोहचते. पूर्ववाहिनी ही नदी रामकुंडात काहीशी दक्षिण वाहिनी होऊन नाशिकच्या भूगोलाला आणि नाशिकरांच्या मनोविश्वाला व्यापून पुढे जाते.
पुढे पुणतांबे, कोपरगाव, प्रवरासंगम, पैठण, राक्षसभुवन, गंगाखेड, मंजरथ, नांदेड अशी महाराष्ट्रीभूमीतील गावे सुजलाम सुफलम करत आंध्रात प्रवेश करते. या प्रवासात दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा या तिच्या सख्या तिला येऊन मिळतात. 1,450 किमीचा प्रवास करून आंध्रप्रदेशात राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
गोदेच्या काठावर अनेक गावे आहेत पण तिच्या उगमाजवळ असणार्या नाशिकचे आणि तिचे नाते खास आहे. गोदावरी खोर्यात ताम्रपाषाण युगापासून मानवी वस्ती असावी. प्रवरेकाठी सिंधू संस्कृतीला समकालीन जोर्वे संस्कृतीच्या खुणा सापडतात. पुराणकथानुसार दंडक राजाला मिळलेल्या शापामुळे हिच्या काठावर घनदाट अरण्य माजले. हिंस्त्र श्वापदे आणि राक्षसांच्या त्रासाने ’त्रिकंटक’ असणारी ही भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ‘जनस्थान’ झाली. सातवाहन, यादव, मराठा साम्राज्य, इंग्रज अशा कितीतरी राजवटी गोदेने पहिल्या. प्रत्येक युगात, प्रत्येक कालखंडात नाशिकची नाळ गोदावरीशी नेहमी कायम राहिली.
मध्यंतरी गोदावरी हा नितांत सुंदर चित्रपट येऊन गेला. त्यातला निशिकांत म्हणतो, नाशिककरांच्या धमन्यांतून रक्त कमी आणि गोदावरी जास्त वाहते. नाशिककर मात्र हा अनुभव रोज जगत असतात. पूर्वी गोदेच्या दोन्ही तीरावर ‘गावात’ राहणार्या नाशिककरांच्या रोजच्या आंंघोळीपासून तर रात्रीच्या गप्पांच्या बैठकीपर्यंत दिवसाचा बराच वेळ हिच्या काठावर जायचा. सध्या शहरात रहायला गेले तरी प्रभू रामाचा रथ, रंगपंचमीची रहाड, धुळवडीचे वीर, दसर्याचे रावणदहन, दिवाळीची आतिषबाजी, पणती पौर्णिमेचा दीपोत्सव, संक्रांतीचे पतंग असे सगळे सण साजरे करायला नाशिककर गोदामाईच्या काठावर जमतात.
नाशिककर आईच्या दुधानंतर पहिल्यांदा गोदामाईंचं पाणी पितात. जीवनभर हिच्याच काठावर जगत शेवटी अस्थींच्या रूपाने हिच्यातच जाऊन मिळतात. गुरुचरित्रात म्हटले आहे, ‘या गतिर्योगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसाम् । सा गतिः सर्वजन्तूनां गौतमीतीरवासिनाम् ॥ अर्थात, कठोर तप करणार्या मुनींना जो मोक्ष, जी गती मिळते तीच गती गोदावरीच्या तिरावर वास करणार्या सर्व जीवांना विनासायास मिळते.
एखाद्या संध्याकाळी रामकुंडावर यावं. मंदिराच्या घंटानादात, आरतीच्या शंखनादात हीच धीरगंभीर रूप पाहावं. पात्रात भक्तीने सोडलेले दिवे वार्याच्या झुळकीने मंद हेलावत असावेत. कोणी पाण्यात डुबकी मारत आहे, कोणी काठावर स्तोत्र म्हणत आहे, कुठे लहान बाळाचे जावळ काढून त्याला हिच्या पाण्यात पहिल्यांदा अंघोळ करवताय तर कुठे कोणी गेलेल्या सुहृदाच्या अस्थी पाण्यात विसर्जन करतंय. हिच्या काठावर कुठे सृजनाचे डोहाळे आहेत तर कुठे मरणाचे पिंडदान. कोणी पाप धुण्यात मग्न तर कोणी पुण्याच्या शोधात. काठावरच सुख-दुःख, जीवन-मरण, ईच्छा-पूर्ती सगळं समानतेने पाहत ही मात्र स्थितप्रज्ञासारखी वाहतेच आहे.
अशा वेळी ऋग्वेदातल्या विश्वामित्र -नदी संवाद सुक्तासारखं आपण पण म्हणावं
‘रमध्वं मे वचसे सोम्याय ऋतावरीरुप मुहूर्तमेवैः ।
प्र सिन्धुमच्छा बृहती मनीषावस्युरह्वे कुशिकस्य सूनुः ॥
ऋग्वेद 3.33 5 ॥(विश्वामित्र -नदी संवाद सूक्त)
(अगं माझे माय, मी कुशिकाचा पुत्र विश्वामित्र एक नदीसूक्त गातो आहे, माझे बोबडे बोल ऐकायला तू क्षणभर थांबशील का ? )
हा प्रश्न मनात ठेऊन, हे सगळे नाद मनात साठवत हळूच गांधीतलावापाशी येऊन बसावं. गंगेच शांत पात्र बघावं. आता सगळे आवाज हळूहळू ऐकू येईनासे होतात. गर्भात बाळाला जसा आईच्या हृदयाचा अनाहत नाद ऐकू यावा तशी फक्त गोदामाईच्या प्रवाहाची संथ खळखळ कानी पडते. त्या खळखळाटात गोदामाई जणू म्हणत असते
आ ते कारो शृणवामा वचांसि ययाथ दूरादनसा रथेन ।
नि ते नंसै पीप्यानेव योषा मर्यायेव कन्या शश्वचै ते ॥
ऋग्वेद 3.33 10 ॥ (विश्वामित्र -नदी संवाद सूक्त)
(अरे बाळा , तुला जें कांही बोलावयाचें आहे ते सारे मी ऐकते आहे. माझ्या उगमपासून तू फार लांब आला आहेस. थकला आहेस. बाळाला पाजणार्या लेकुरवाळी आईप्रमाणें मी तुला कुशीत घेते) आणि मग आईच्या कुशीत झोपणार्या बाळाप्रमाणे गोदामाईच्या काठावर सुखाने बसावं. हे स्वर्गसुख नाशिककर रोज अनुभवत असतात.
गो म्हणजे इंद्रिय (5 ज्ञानेंद्रिय, 5कर्मेंद्रिये,1 मन) यांना जीवन देणार्या, पोषण करणार्या ज्या गोष्टी आहेत (गोदा) त्यांच्यात सर्वश्रेष्ठ असणारी ही ’गोदावरी’! सत्ययुगात अवतरलेली गोदा आज कलियुगात पण तशीच निरंतर वाहत आहे. गोदमाईचा प्रवाह आपलं जीवन असच उजळत राहो याच तिच्याकडे तिच्या जन्मोत्सव निमित्त प्रार्थना!!!!
लेखक : विनय मधुकर जोशी