Monday, November 25, 2024
HomeनाशिकBlog : अशी जुळली साखळी!

Blog : अशी जुळली साखळी!

नाशिक | छाया देव

करोनाचा उच्छाद जगभर  सुरु झाल्यामुळे जबरदस्तीने घरात बसले असताना, बसल्या बसल्या मनात विचार सुरु होते…

- Advertisement -

“स्वत:ची कातडी बचावण्याचा हा प्रयत्न बरोबर आहे?”

“पण तुझ्यासारख्या सत्तरीत शिरलेल्या बाईने स्वत:ला सांभाळणं हेही गरजेचं आहे. तुला जर संसर्ग झाला तर इतर अनेकांना नाही का विलग व्हावं लागणार?”

पण इतर अनेकजण समाजात फिरून गरजूंना मदत करत होते ( कधी पुरेशी काळजी घेऊन तर अनेकदा न घेताही. नाशिकमध्ये बराच काळ एकही लागण झालेली नसल्याने लोकांत थोडा निष्काळजीपणा आला होता पण अदिती काही मला उंबरठ्याबाहेर जाऊ देत नव्हती. अगदी शेजारच्या वाण्याकडे सोडा, दारात आलेल्या भाजीवाल्याकडे? “नाही!”

तरीही मी आम्हा तिघींसाठी घरातील कापडाचे दुपदरी मास्क बनवले.  आसपास मला बहुतेक जण चेहऱ्यावर मास्क न बांधता फिरताना दिसत होते. भाजीवाले, घरकाम करणाऱ्या बायका, इतर फेरीवाले यांच्या बाबतीत पैशाची अडचण असेल असा निष्कर्ष काढून मी आणखीही डझनभर मास्क बनवले आणि जवळच्या वाण्याच्या दुकानात नेऊन दिले. त्यांना म्हटले, “मास्क न लावता येणाऱ्यांना हे द्या आणि ‘पुन्हा येताना मास्क बांधून या,’ असे सांगा.” पुढे आणखी मागणी आली नाही, मीही विचारायला गेले नाही.

त्यातच मिलिंदकडून फोन आला, “छायाताई आपण एक गट बनवून सध्याच्या काळातील लोकांच्या अडचणीत त्यांना मदत करू या असे वाटते. तुम्ही सामील व्हाल न?”

मी म्हटलं, “जरूर, मला खंत वाटतच होती, आपण काही करत नाही अशी.”

आमच्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, मानव अधिकार संवर्धन संघटन, व लोकाधार या तीन संस्थांच्या  आवाहनाला प्रतिसाद म्हणून देश परदेशातले विद्यार्थी व जबाबदारी उचलणाऱ्या  देणगीदारांकडून मदत येऊ लागली. आमचा भर तत्काळ लागणाऱ्या शिजवलेले अन्न आणि शिधा यांचा पुरवठा करण्यापेक्षा (कारण जरी तशा मदतीची गरज खूप होती पुरवणारे हातही पुष्कळ होते.) औषधे आणि इतर गरजेच्या वस्तू जसे पादत्राणे इ. पुरवण्याचे आम्ही ठरवले होते.

जिथे कुणीच पोचले नव्हते, अशा गोंडवाडी येथील दीपक व सूरज ‘एकलव्य’ विद्यार्थ्यांनी तरी त्यांच्या वस्तीत अन्नाची गरज आहे ही बातमी आमच्यापर्यंत पोचवली आणि काही  अन्नदान करू इच्छिणारेही आमच्या संपर्कात आले आणि  एप्रिल महिनाभर रोज दोन वेळा गोंडवाडीतील सुमारे २०० लोकांच्या जेवणाचा भार त्यांनी उचलला. यात आम्ही मदतनीस व समन्वयकाची भूमिका बजावली.

आमच्या गटाच्या फोनवर एकत्र बैठका होत होत्या आणि अनेक वेळा ‘ काहीच करत नाहीय याची खंत मला वाटत आहे’ असे बोलून दाखवत होते. मी अजूनही काहीच आर्थिक योगदान केलेलं नव्हतं आणि मला चुकल्यासारखं वाटत होतं. बाकीचे सहकारी मला धीर धरायला सांगत होते.

एके दिवशी सकाळी अदिती तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होती आणि तिला कळलं की मालेगावातील एका सरकारी इस्पितळात तिच्या मैत्रिणीची वहिनी काम करतेय आणि तिच्या हाताखालील २०० आशा कर्मचारी वस्त्यांतून स्वॅब घ्यायला फिरतात पण कुणाकडेच मास्क वगैरे नाहीत! तिनेच शिंप्याकडून तीन पदरी मास्क शिवून घेतले आणि त्यांना दिलेत पण खरं तर त्यांना फेस शील्डची गरज आहे.

आम्ही यावर बोललो, पण काही निर्णय घेतला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा मैत्रिणीशी बोलणं झाल्यावर आम्हाला वाटलं इथे मदतीची गरज आहे, आपण हे करू शकतो. डॉक्टर वहिनी आणि त्यांचे पती (तेही डॉक्टरच आहेत) यांच्याशी बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले तुम्ही पैसे पाठवू नका, सामानच पाठवा. दोन कारणे: एकतर मालेगावात सामग्रीची टंचाई आहे आणि काळ्या बाजारात घेऊ गेलं तर पाच नगांच्या किमतीत दोनच नाग मिळतील! शेवटी दोन तीन दिवस आणि अनेक फोन नंतर आम्ही ठरवलं की आपण वैयक्तिकरित्या १०० फेस शील्ड देऊ या. आता खरेदीचा मुद्दा आला.

दोन दिवसांपूर्वीच माझ्या एका मैत्रिणीच्या डॉक्टर नवऱ्याने काही PPE किट्स दिल्याचे कळले. त्यांच्याकडे विचारणा करून विक्रेत्यांचे नंबर मिळवले. आमचा एक फार्मसीवाला विद्यार्थी आहे प्रशांत निमसे, त्यालाही चौकशी करायला सांगितले. प्रत्येकाकडच्या वस्तूही वेगळ्या आणि त्यांच्या किमतीही वर-खाली. एखादा दिवस तर या फोनाफोनीत गेला.

संध्याकाळी गटाच्या बैठकीत ( प्रत्येकजण फोन घेऊन आपापल्या घरात बैठक मारून बसलेला!) एकूण प्रगती सांगितली. मिलिंद म्हणाला, “आता नाही न खंत वाटत, आपण काही करत नाही याची?” मी म्हटलं, “जोवर हे काम तडीला लागत नाही तोवर खंत आहेच!” शेवटी फोन ठेवता ठेवता श्यामला म्हणाली, “छायाताई, तुम्ही एक फोन प्रशांत केळकरला करा.” प्रशांत केळकर आरोग्य खात्यात काम करतो, माहिती, जनजागृतीचं काम करतो.

त्याने सगळी चौकशी केली, मालेगावात कुणासाठी, खाजगी की सरकारी की नगरपालिकेचे डॉक्टर? साहित्य कुणाला देणार? इ. मी स्पष्ट केल्यावर तो म्हणाला, “ तुम्ही स्वत:च देणार असाल तरी मी सांगतो त्या व्यक्तीला फोन करा. त्यांनी नुकतेच जि.प.च्या कर्मचाऱ्यांना मास्क दिलेत. ती व्यक्ती आणखी दान देऊ इच्छिते. कदाचित तुम्ही सांगितले तर ते स्वत:च खर्च करतील. निदान कुठून माफक दारात खरेदी करावी, एवढे तरी कळेल.

” त्याच्या कामातून आठवण ठेवून त्याने मला दुसरे दिवशी नाव व नंबर दिला. नावावरून मला अंधुक आठवले की मुकुंद दीक्षितांनी माझी या  GIVE welfare organisation च्या रमेश अय्यरांशी ओळख करून दिली होती. संध्याकाळी मी त्यांना फोन केला. त्यांनी उत्सुकता दाखवली आणि काय काय हवे आहे असे विचारले. मी म्हटले, “गरज बऱ्याच वस्तूंची आहे, मी फक्त फेस शील्ड देणार आहे.

” ते म्हणाले, “मी सर्व काही देईन, तुम्ही मला लेटरहेडवर तुम्हाला हव्या असलेल्या सामग्रीची यादी असलेलं पत्र द्या.” मी म्हटला, “माझं तर लेटर हेड नाही आणि काय हवंय ते डॉ. दिलीप भावसारांना माहित! मी त्यांनाच पत्र लिहायला सांगते.” भावसारांना फोन करून अय्यरांशी बोलायला सांगितलं.

संध्याकाळी भावसारांकडून व्हॉट्स अॅप वर नमुन्याबरहुकूम पत्र मिळाले. अय्यरांनी त्यांना माझ्यामार्फत पत्र पाठवायला सांगितले होते, मग मी ते अय्यरांकडे पाठवले. एकूण गरज अंदाजे ७-८ लाखांच्या सामग्रीची होती… PPE किट्स, शील्ड्स, मास्क्स, ग्लोव्स – ‘आशां’साठी आणि डॉक्टरांसाठी. एवढं सगळं अय्यर एकटे करतील? मी मग त्यांच्याशी बोलले.

त्याचं म्हणणं होतं मी हे सर्व माझ्या ग्रुपवर टाकीन. जेवढं इतरांकडून मिळेल ते मिळवीन. बाकी मी स्वत: करीन. तुम्ही दुकानातून घेता मी डायरेक्ट उत्पादकाकडून घेतो त्यामुळे भावात खूपच फरक पडतो. शिवाय सध्या या सामग्रीच्या विक्रीत नफेखोरीही खूप होतेय. (मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणे ही म्हण प्रत्यक्षात आलेली सध्या जागोजागी दिसते.)

ही गोष्ट शनिवारची, सोमवारपर्यंत सामान मालेगावला पोचेल असं आश्वासन मिळालं. शासनाच्या आरोग्य विभागाकडे सामान पोचवावे तर सरकारी यंत्रणेतून सामान योग्य हाता पर्यंत पोचेल का अशी शंका सगळ्यांना वाटत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन केला तर काही सामान गोळा झालेले होतं, पण पुढची व्यवस्था झालेली नव्हती.

मग मी सचिन मालेगावकरांना फोन केला. सध्या मालेगावात कार्यरत असलेले एक वरिष्ठ सरकारी अधिकारी हे त्यांचे सुपरिचित व  प्रामाणिक अधिकारी आहेत असं ते म्हणाले. पण त्यांचा नंतर फोन आला की ही सामग्री शासनाकडे जमा करायची नसून कुणापर्यंत पोचवायची असेल तर त्यांना ते थोडं कठीण वाटत होतं कारण ते स्वत: कामानिमित्त कार्यालयातून बाहेर असताना आलेली सामग्री योग्य व्यक्तीकडे सुखरूप पोहचवणे जिकिरीचे होऊ शकते. पण इतर कुणी जर ती नाशिकहून आणून पोचवत असेल तर त्या वाहनाला निर्धोकपणे जाता येईल एवढी व्यवस्था ते करू शकतील.

अशा तऱ्हेने सामग्री रवाना होत नव्हती. भावसारांनी आम्हाला कळवल्यापासून साधारण सहा दिवस लोटले होते. योग्य संरक्षणाशिवाय विषाणूंना सामोऱ्या जाणाऱ्या त्या ‘आशा’ आणि त्यांची मुलंबाळं रोज माझ्या डोळ्यासमोर येत आणि रुखरुख वाटे. इंग्रजीतील म्हण ‘there is a slip between a cup and a lip’ याची प्रचीति येणार की काय असेही वाटू लागले. पण हे काम तडीला न्यायचेच हे निश्चित होते.

आधल्या दिवशी आमच्या फोन-बैठकीत शांतारामभाऊ मला म्हणाले होते, सामग्री पाठवण्यात काही अडचण असल्यास मला सांगा, मी व्यवस्था करू शकतो. आता ती वेळ आली आहे असे वाटून मी भाऊंना फोन केला. माझे बोलणे ऐकून झाल्यावर ते म्हणाले, ठीक आहे, माझ्यावर सोडा.

दहा बारा मिनिटात मला संदीप भावसारांचा फोन आला. “तुम्हाला काही वैद्यकीय सामग्री मालेगावला पाठवायची आहे न? काय आहे? कुठून घ्यायची आहे? कुणाकडे पोचवायची आहे?’ मी सारे सांगितल्यावर ‘पुन्हा फोन करीन’ असे सांगून फोन बंद केला. दवा बाजारातील संतोष जाजूंशी संपर्क साधून सोय करण्याचा प्रयत्न करतो तसेच डॉ. भावसारांना  आणि रमेश अय्यरांना मी ओळखतो असेही त्यांनी सांगितले. अगदीच सोय झाली नाही तर मी माझ्या गाडीचा पास काढून सामान मालेगावी पोचवीन असे सांगितले.

थोड्या वेळाने सांगितल्या प्रमाणे त्यांचा फोन आला. संतोष जाजूंच्या ओळखीतील आशिष झंवर यांचे ऑक्सिजन सिलिंडर रोज मालेगावी जातात. त्या गाडीतून सामग्री जाऊ शकेल असे सांगितले. ड्रायव्हरचा नंबरही कळवला. मी या विषयी डॉ. भावसार व अय्यर यांना कळवले व समायोजन करण्याची विनंती केली. मात्र अय्यरांनी स्पष्ट सांगितले की सामान ड्रायव्हरच्या हाती सुपूर्द करताना तुम्ही स्वत: हजर राहावे. मी नाही पण माझी मुलगी हजर राहील असे आश्वासन मी त्यांना दिले.

आणखी एक गोष्ट बाकी होती, अय्यरांनी सामानाचे फोटो पाठवले होते त्यात सामग्री मोकळी पडलेली दिसत होती. ती नीट बांधाबांध करून ठेवणे गरजेचे होते. मग मी मुकुंद दीक्षितांना फोन केला. त्याला विचारले की तू अय्यरांशी बोलून घे. सामानाची बांधाबांध करायला श्यामला गोपीला पाठवेल,  तू नचिकेतला पाठवशील का? मुकुंदने मान्य केले आणि वीसेक मिनिटात मला परत फोन केला.

सामानाची बांधाबांध अय्यर स्वत: आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने करणार होते आणि भावसार उद्या वाहन पाठवतील त्यात हे सामान जाईल. आताचे सामान हा एक हिस्सा आहे पण संपूर्ण गरज भागवण्याला मी वचनबद्ध आहे, असे अय्यरांनी मुकुंदला सांगितले!

या नंतर मी ठरवले की दुसरे दिवशी अय्यर किंवा भावसार यांच्यापैकी एकाचा फोन आला तर अदितीला सामान चढवताना पाठवायचे. अय्यरांनी बांधलेल्या सामग्रीचे फोटो पाठवले होते. मोठे चार पाच डाग होते. पण दोघांपैकी कोणाचाच फोन आला नाही, मुकुन्दचाच आला. ‘सामान पाठवलं का?’ ‘माहीत नाही, मी फोनची वाट आहते आहे,’ मी म्हटले. ‘मग मी दोघांशीही संपर्क करतो आणि बघतो काय झालेय ते,’ मुकुंद म्हणाला.

थोड्या वेळाने (९-९:३० च्या दरम्यान) अय्यरांचा सामानाच्या फोटोसह मेसेज आला, “ सेन्डिंग टू मालेगाव.” म्हणजे सामग्री मार्गस्थ झाली तर!

नंतर तासाभराने मुकुंदचा फोन आला, “ माझ्या फोन नंतर भावसारांनी अय्यरांचा  फोननंबर ड्रायव्हरला  कळवला. मग ड्रायव्हरने अय्यरांना फोन करून सांगितले की, “मी मायको सर्कलला उभा आहे आणि तुम्ही मला इथे समान आणून द्या.’ अय्यरांना अपेक्षा नव्हती. ते राहतात गंगापूर रोडला. त्यांनी विचारले, ‘गाडीत सामान भरून इतक्या दूर आणायला मला अर्धा तास तरी लागेल, तोवर थांबशील ना रे बाबा?” तो हो म्हणाला तेव्हां त्यांनी गाडी काढले, दोघा नोकरांसह सामान भरले व जागेवर पोचले.

वाहन म्हणजे मोठा ट्रक होता आणि इतर अनेक वस्तू त्यात भरलेल्या होत्या. बरे झाले त्यांच्या सोबत दोघेजण होते त्यामुळे सामान चढवता आले. नंतर ड्रायव्हरने उद्धटपणाने  पैशाची मागणी केली आणि अय्यरांना आणखीच धक्का बसला! त्यांनी डॉ. भावसारांना फोन केला आणि तो प्रश्न सुटला.

दुपारी पावणे तीनच्या सुमारास भावसारांचा मेसेज आला, ‘तासाभरात सामान पोचेल!’

सव्वा चारच्या सुमाराला सामान पोचल्याचा मेसेज आला आणि मला हुश्श वाटले!.

दोन दिवसांनी भावसारांनी सामग्री ‘आशा’ कर्मचाऱ्याना वाटतानाचे फोटो पाठवले आणि त्या किती खुश झाल्या आहेत असे सांगितले. तेव्हा मी म्हटले, “ खुश तर आम्ही आहोत! बिनीच्या शिलेदारांना आम्ही संरक्षक सामग्रीशिवाय लढायला पाठवले होते याची बोच आता थोडी तरी कमी झाली.”

काल पुन्हा अय्यरांचा मेसेज आलाय, “आणखी सामग्री गोळा केलीय, मंगळवारी पाठवू.”

मी  भावसारांना फोन करून सांगितले आणि सामग्री पाठवण्यासाठी वेगळा मार्ग शोधण्याची विनंती केली.
या निमित्ताने घरबसल्या आपण काहीतरी चांगलं घडवू शकलो याचं समाधान वाटलं, त्यासाठी किती जणांनी मुठभर, चिमुटभर योगदान दिलं हे जाणवलं आणि किती जणांशी माझा परिचय झाला हेही आनंददायी वाटलं.

आपण काहीच करत नाही याची खंत कमी झाली, हेही नसे थोडके!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या