लेखक : एन. व्ही. निकाळे, वृत्तसंपादक, देशदूत, नाशिक
आठवड्याची सुटी असल्यावर सायंकाळी भाजीबाजारात फेरफटका होतोच. आठवड्यात लागणाऱ्या भाजीपाल्याची खरेदी करून गृहमंत्र्यांना तेवढाच हातभार लावण्याचे कर्तव्य पार पाडता येते. मध्यंतरी असाच भाजीबाजारात गेलो होतो. भाजीपाल्यासोबत ओला हरभरा नजरेस पडला. हिरव्यागार हरभरयाच्या जुड्या पाहिल्यावर त्या विकत घेण्याचा मोह आवरला नाही.
मलाच काय, कोणालाही तो आवरला नसता. आवरणार नाही. टपो-या घाट्यांची चवच न्यारी! घरी आल्यावर घाटे खुडले. सौभाग्यवतीने ते तव्यावर भाजून दिले. भाजलेल्या हरभरयाचा आस्वाद घेताना मन 35-40 वर्षे मागे गेले. गावाकडील शेतमळ्यातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
शेती करणाऱ्या कुटुंबातील एखादा मुलगा नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात बि-हाड करुन राहायचा. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या लागल्यावर आपल्या मुलाबाळांना घेऊन गावाकडे आपल्या आप्तांमध्ये जाण्याची व काही दिवस मौजमजेत घालवण्याचा बहुतेक नोकरदार मंडळींचा शिरस्ता असायचा.
विशेषतः शहरात गेलेली कुटुंबातील सगळी माणसे गावातील घरात एकत्र येत. सुखाच्या चार गोष्टी करीत. सुटी संपल्यावर जो-तो आपापल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी जड अंतःकरणाने परतत असे.
सुटीहून शहरात परतल्यावर सोबत आणलेल्या आठवणींचा आणि शेता-शिवारात पिकलेला भाजीपाला तसेच इतर वस्तूंचा वाणोळा वाटला जायचा.
मित्रमंडळी आणि शेजारी-पाजा-यांपुढे तो अभिमानाने मांडताना कितीतरी आनंद होत असे. गावाकडील हे वैभव पाहून आणि ऐकून आपल्यालाही सुट्यांमध्ये गावाकडे जाऊन शेतीवाडीतील आनंद उपभोगायला मिळावा असे त्यांनाही वाटे, पण तो आनंद मिळत नसल्याने आपल्यासारख्या भाग्यवंतांचा त्यांना हेवा वाटायचा.
तेव्हा आम्ही दहा-पंधरा वर्षांची भावंडे असू. शाळांना दिवाळी किंवा उन्हाळ्याची सुटी लागली की आप्पा म्हणजे वडील हमखास गावाकडे घेऊन जात. दुपारची पॅसेंजर रेल्वेगाडी जाण्यासाठी ठरलेली. रेल्वे स्टेशनपासून गाव सात किलोमीटर! स्टेशनवर उतरल्यावर टांग्याने जावे लागत असे.
टांग्यातून जाताना खूप मजा वाटे. सुटीचा तो काळ मंतरलेला असे. गावात, शेतात मनसोक्त फिरायला मिळे. गावातून भर उन्हाळ्यातही खळाळणा-या नदीत अथवा पाटचारीच्या पाण्यात यथेच्छ, मुक्तपणे डुंबायला मिळे.
मोठ्यांसोबत हट्टाने घरच्या बैलगाडीत बसून शेतात जाण्याची मौज महागड्या मोटारगाड्यांमधून फिरणा-यांनाही कधी मिळणार नाही. शेतात गेल्यावर चिंचा, बोरे, कै-या आदी झाडावरून पाडून या रानमेव्याची चव चाखायला मिळत असे. शेजार-पाजारच्या शेतक-यांकडून आपुलकीच्या हक्काने ऊसाची टिपरे मागवून रसाची गोडी चाखण्याची संधी मिळे.
दसरा-दिवाळीच्या सुमारास बाजरीची हिरवीगार कणसे शेतातच भाजून बाजरीचा लिंबुर खाताना घरच्या शेतीचे वैभव पाहून घराण्याच्या समृद्धीचा अभिमान वाटत असे. मार्च-एप्रिलमध्ये रब्बीचा हंगाम हवाहवासा वाटे. गव्हाच्या ओंब्या आणि ओल्या हरभ-याचा उळा भाजून तेथेच खाण्याचा आनंद काही वेगळाच! कधीतरी भुईमुगाच्या शेंगाचे डहाळे उपटून शेतातील काडी-कच-यावर भाजून तो रानमेवा आस्वादता यायचा.
दिवाळीच्या सुमारास कापणी झालेले बाजरीचे पीक सुड्या रचून शेतातच ठेवले जायचे. बाजरीच्या मळणीसाठी खळे तयार केले जाई. कणसे खुडून त्यावरून बैलांची पाथ (बैलजोडी) फिरवली जायची. बैलांच्या खुरांनी कणसाचे दाणे मोकळे होई. मळणी झालेले धान्य सुपात घेऊन वा-यावर धरले की निर्मळ झालेल्या धान्याची रास जमा होई. काडी-कचरा वा-याने बाजूला पडे. मग शेराच्या (धान्य मोजण्याचे माप) हिशोबाने धान्याची पोती भरून बैलगाडीतून घरी आणली जात. घराच्या बैठक खोलीत धान्याच्या पोत्यांच्या राशी रचल्या जात. सुट्यांमध्ये मोठ्या मंडळींच्या शेतीवाडीच्या, पाऊस-पाण्याच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत. बच्चे कंपनी बाहेर अंगणात मनसोक्त खेळत.
आता परिस्थिती बदलली आहे. माणसे पांगली आहेत. जो-तो शहरातच रमला आहे. नाती दुरावली आहेत. जिव्हाळा-आपुलकी संपुष्टात आली आहे. पत्रांचा जमाना मागे पडला आहे. मोबाईल आणि इ-मेलचा जमाना सुरु आहे. आता कोणी कोणाला पत्रे लिहित नाही. पोस्टमन काका दिसणे दुर्मिळ झाले आहे. मोबाईलवर गप्पा गोष्टी होतात, पण त्या कोरड्या असतात. व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात आपुलकी मात्र हरवली आहे. सारे जग जवळ आले असे म्हटले जाते.
जगातील बित्तंबातम्या टीव्हीच्या छोट्या पडद्यावर क्षणार्धात समजतात, पण एकाच शहरात राहणारी माणसे वर्ष-सहा महिन्यांनी एकमेकांना क्वचितच भेटतात, तीसुद्धा कोणाच्या तरी लग्नकार्यात किंवा एखाद्या दुःखद प्रसंगी! एरव्ही प्रत्येक जण आपापल्या विश्वात रमलेला असतो. नात्यांचा ओलावा संपुष्टात आला आहे. आजच्या व्यवहारी जगात नात्यांचे नाजूक धागे तुटले आहेत. आधुनिक काळाचा हा महिमा म्हणावा का?