Sunday, November 24, 2024
Homeब्लॉगBlog : ममा

Blog : ममा

विजयलक्ष्मी तिचे नाव. डॉक्टर होती आणि तिची मुलगी तिला ममा म्हणायची म्हणून तिच्या हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ, नर्सेस आणि ज्युनियर डॉक्टर्स तिला ममा मॅडम म्हणायचे. तिचे वय केवळ पस्तीस होते. मुलगी सुनयना अठरा वर्षांची…

विजयलक्ष्मीचे लग्न केवळ सोळाव्या वर्षी झाले होते. ही कथा विसाव्या शतकाच्या सुरुवातीची. सोळाव्या वर्षी लग्न म्हणजे सामाजिक दृष्टीने उशीरच होता पण विजयलक्ष्मीचे वडील थोडे सुधारक होते. त्यांनी तिला शांती निकेतनमध्ये ठेवले होते व मुलींनी लग्नापूर्वी काहीतरी शिकावे असे त्यांचे ठाम मत होते. विजयलक्ष्मीची आई त्यामुळे गप्प बसली.

- Advertisement -

विजयलक्ष्मी खूपच देखणी होती. खरोखर नक्षत्रासारखी. तिला एका खूप प्रतिष्ठित घराण्यातून मागणी आली. मुलगा डॉक्टर होता. सगळेच छान जुळून आले आणि हुंड्याविना लग्न झाले. विजयलक्ष्मी सासरी आली आणि सगळ्यांचीच लाडकी झाली. मुलाला अजून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा होती. मुलाचे नाव नयन.

लग्नानंतर आठ नऊ महिन्यांनी तो इंग्लंडला निघून गेला. सगळे घर उदास झाले. विजयलक्ष्मी तर खूपच उदास झाली. दोन महिने गेले आणि विजय लक्ष्मी गरोदर असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. घरात सगळे आनंदित झाले. नयन बाबूंना ती बातमी कळविण्यात आली. त्यांनाही खूप आनंद झाला. आपली एम. डी. संपवूनच भारतात येण्याचा त्यांचा विचार होता. त्यावेळी ते आगबोटीने इंग्लंडला गेले होते. विमानात बसून पटकन येण्यासारखी स्थिती नव्हती.

मात्र वेगळेच विधीलिखित होते. नयनला टी. बी. झाला. त्याच्यावर उपचार सुरू झाले मात्र त्यातच त्याला निमोनिया झाला आणि तो दगावला. विजयलक्ष्मी आणि इतर सर्व कुटुंबियांवर तो वज्राघात होता. नयनच्या वडिलांनी आपल्या एका तिथे राहणार्‍या मित्राला नयनचा अंत्यसंस्कार करायला सांगितले. त्याची थोडीशी राख(अस्थी) पोस्टाने भारतात आली. भयानक दिवस होते ते. नयनाच्या आईने शोकाकुल अवस्थेत विजयलक्ष्मीचा हा वाईट पायगुण असल्याचे सांगून टाकले. नयनचे वडील समंजस होते. त्यांनी पत्नीची समजूत घालायचा प्रयत्न केला व सुनेच्या पाठीशी उभे राहिले.

आता त्यांना केवळ तिच्या सुरळीत बाळंतपणाची काळजी होती. विजयलक्ष्मीवर खूप मोठा मानसिक आघात झाला होता. तिच्या आई-वडिलांनी तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची विनंती केली मात्र विजयलक्ष्मीने नकार दिला. तिला भाऊ होता. वहिनी होती. तिचे आई-वडील एकटे नव्हते मात्र ती जर माहेरी निघून गेली असती तर तिचे सासू-सासरे खूपच एकटे पडले असते. सासूने तर बिछान्यावर अंग टाकले होते. तिला सून नकोशी असली तरी विजयलक्ष्मी सर्वतोपरी तिची काळजी घेत होती. मात्र ती अगदी अबोल झाली होती.

सासरे तिच्या पाठीवर मायेने हात फिरवीत व म्हणत,आता तूच आमचा मुलगा आहेस. तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही!

विजयलक्ष्मीचे डोळे भरून येत. ठरल्यावेळी सुरळीत बाळंतपण झाले व तिला मुलगी झाली. खूप सुंदर. अतिशय सुरेख डोळे! तिचे नाव सुनयना ठेवण्यात आले. त्या नावात नयनचे देखील अक्षर होते.

कलेकलेने सुनयना वाढू लागली. ती दोन वर्षांची झाली आणि विजय लक्ष्मीच्या सासुबाई वारल्या. तिच्या सासर्‍यांवर तो अजून एक आघात होता मात्र ते खचले नाहीत. काही महिने गेल्यावर त्यांनी विजयलक्ष्मी पुढे एक प्रस्ताव मांडला,बेटा तू पुढे शिकावीस अशी माझी इच्छा आहे. पुढे शिकून तू डॉक्टर व्हावेस!

बाबा! घरी नैनीला आई हवी आहे. मी बाहेर पडल्यावर तिचे कोण करणार?ती म्हणाली.

बेटा! मी आहे ना! आणि आपले सगळे नोकर -चाकर चांगले आहेत. तिला जी बाई सांभाळते ती देखील खूप चांगली आहे. तू मुळीच काळजी करू नकोस!बाबा म्हणाले. विजयलक्ष्मीने होकार दिला आणि तिचे पुढचे शिक्षण सुरू झाले. तिने मन लावून अभ्यास सुरू केला.

कॉलेजमधून घरी आली की आधी नैनी तिला मिठी मारी. तिला सुरुवातीला खूप दिवस आई शिवाय करमत नसे आणि विजयलक्ष्मीचेही मन तिच्याशिवाय लागत नसे. मग विजयलक्ष्मीचे येणे जाणे दोघींच्या अंगवळणी पडले. नैनीची शाळा सुरू झाली. तिचे आजोबा खूप मन लावून तिचा अभ्यास घेत. तिच्याशी लपाछपी खेळत.

अजून मोठी झाल्यावर तिच्याबरोबर बुद्धिबळ आणि इतर गेम्स देखील खेळत. तिच्या शाळेला भेट देत. विजयलक्ष्मी दुर्लक्ष करी असे नाही पण तिला तिच्या प्रॅक्टिकल्स आणि अभ्यासामुळे वेळच होत नसे. नैनी लहानपणी खूप लाघवी होती. शाळेत देखील तिचे खूप लाड होत. अभ्यासातही हुशार होती. वर्षामागून वर्षे लोटली आणि विजयलक्ष्मी एमबीबीएस झाली. तिची ळपींशीपीहळि सुरू झाली. तिला खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि तिने गायनॅक विषय पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी घेतला.

तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले. तीही ळपींशीपीहळि सुरू झाली. तिच्या सासर्‍यांची इच्छा होती की तिच्यासाठी एक छोटेसे हॉस्पिटल सुरु करुन द्यावे. त्यांनी तसे केलेही. तोवर तिने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे नोकरी केली. तिला खूप चांगला अनुभव मिळाला.

दुसरीकडे नैनी तरुण होत होती. तिच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणी घरी येत. ती खूपच सुंदर होती आणि कोणीही पटकन तिच्याकडे आकर्षित होत असे. तिच्या बाईला मुले घरी आलेली फारशी आवडत नसत मात्र नैनीचे आजोबा बाईची समजूत घालत.

बाई! जमाना बदलत आहे. जोवर ती मुलांमध्ये मिसळत नाही तिला बरे वाईट कसे समजणार?

हॉस्पिटलचे उद्घाटन झाले व नाव दिले गेले, ममाचे हॉस्पिटल(केवळ स्त्रियांसाठी). तिचे आधीच चांगले नाव झाले होते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व नर्सेसच्या अपॉइंटमेंटस झाल्या होत्या आणि सगळे सुरळीत सुरू झाले.

एक दिवस विजयलक्ष्मी हॉस्पिटल मधून घरी आली तर तिला नैनीची बाई म्हणाली,ममा मॅडम, नैनी आज संध्याकाळी घरी आलीच नाही ! तुम्हाला तिने काही सांगितले होते का?

नाहीतर! तिच्या दद्दुला विचारते! विजयलक्ष्मी घाबरून म्हणाली.

विजयलक्ष्मी पळत-पळत तिच्या सासर्‍यांकडे गेली व म्हणाली,बाबा नैनी तुम्हाला काही सांगून गेली होती का? ती घरी आलेली नाही!

घाबरू नकोस! ती उशिरा येईल असे मला सांगून गेली होती.तिचे सासरे म्हणाले.

विजयलक्ष्मी तिच्या खोलीत आली. प्रशस्त बेडरूम आणि ओके बोके ड्रेसिंग टेबल. खूप दिवसांनी तिचे लक्ष आपल्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे गेले. खरंच! कसे भरकन दिवस गेले! सोळा वर्षांची मी इथे परिणीता म्हणून आले होते! तिच्या मनात आले! तेव्हा कपाळावर कुंकू, डोळ्यात काजळ आणि भल्या मोठ्या अंबाड्यावर गजरा हा तिचा शृंगार असे. रोज नवनवीन साड्या तिला तिचा पती नेसायला लावी. हात भरून काचेच्या व सोन्याच्या बांगड्यांची खणखण घरात घुमे. पायात छम छम पैंजण, कानात डूल आणि गळा भरून दागिने!

आज चेहरा भकास तिच्याकडे बघत होता. कुंकवाचा करंडा तसाच होता. काजळ ही होते. सगळे ड्रॉवरमध्ये. गुपचूप कुंकू लावून बघावे आणि डोळ्यात काजळ! तिने खोलीचे दार अलगद लावले व तसेच केले. नैनीची वाट बघायची होती. तोपर्यंत तिला जेवायची इच्छा नव्हती.

तिने आरशात स्वतःला न्याहाळून पाहिले! किती सुंदर दिसत होती! सगळे तिला नैनीची मोठी बहीणच समजत! इतक्यात नैनीची बाई रूममध्ये आली आणि विजयलक्ष्मीकडे बघून थक्क झाली! विजयलक्ष्मी देखील अवघडून तिच्याकडे बघत राहिली!

मॅडम! हे काय?तिने आपल्या मालकिणीला विचारले.

क्षणभर विजयलक्ष्मीच्या तोंडातून शब्द फुटेना!

काही नाही! खूप वर्षांची इच्छा जागृत झाली होती! आत्ता पुसून टाकते!असे म्हणत तिने पटकन कुंकू पुसले. बाईच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. ती स्वतः विधवा होती मात्र इतक्या तरुण वयात वैधव्य आले नव्हते. तिचा मोठा मुलगा तेव्हा 25 वर्षांचा होता व कमवायला लागला होता. तिने पुढे होऊन विजयलक्ष्मीला कवेत घेतले व म्हणाली,मला एकदा दृष्ट तरी काढू द्यायची होती! तुमची कोणी दृष्ट काढली नाही म्हणूनच की काय तुम्हाला दृष्ट लागली!

विजयलक्ष्मीच्या डोळ्यातून देखील घळघळा अश्रू वहायला लागले! सगळे काजळ त्यात धुऊन निघाले!

दोघी रात्री बराच वेळ जागल्या. बाईने आपल्याबद्दल विजयलक्ष्मीला सांगितले. तिने काहीतरी खाऊन घ्यायचा खूप आग्रह केला मात्र विजयलक्ष्मीने ऐकले नाही. तिच्या मनात आपल्या लेकीबद्दल हजार शंका डोकावत होत्या. तिला फार जास्त स्वातंत्र्य दिले का?

नैनी पहाटे पाचला उगवली! विजयलक्ष्मी तिला विचारायला पुढे झाली मात्र नैनी आपल्या रूममध्ये पळाली व धाडकन दार लावून घेतले! आता विजयलक्ष्मीच्या मनाचा बंधारा फुटला! ती रडू लागली. बाई तिची समजूत घालू लागली.

थांबा जरा वेळ! उठेल आपल्या आप! सांगेल काय सांगायचे ते!बाई सांगू लागली.

इतक्या वर्षात पहिल्यांदा विजयलक्ष्मीने हॉस्पिटलमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. तिला सगळी शहानिशा करायचीच होती.

दहाच्या सुमारास पेंगुळलेली नैनी आपल्या खोलीच्या बाहेर आली. दद्दूकडे जाणार तोच तिच्या आईने तिला अडवले मात्र तिने आईचा हात झटकून दिला.

नैनी! मला तुझ्याशी बोलायचे आहे! तुझे असे वागणे मला खपणार नाही! विजयलक्ष्मी संयत स्वरात म्हणाली. तिचा उंचावलेला स्वर कोणीच ऐकला नव्हता.

पण मला बोलायचे नाही तुझ्याशी! तुझ्याजवळ माझ्यासाठी वेळ तरी असतो का? तू आणि तुझा दवाखाना हेच तुझे विश्व झाले आहे! नैनी संतापून म्हणाली.

विजयलक्ष्मीला जणू कोणी आपल्याला चपराक मारली आहे असे वाटले. नैनीचे हे वाक्य तिच्या दद्दूनी ऐकले आणि ते पुढे येऊन नैनीला म्हणाले,नैनी! आपल्या आईशी बोलण्याची ही पद्धत नाही! तिने अपार दुःख सहन केले आहे आणि तिचे तुझ्याकडे मुळीच दुर्लक्ष नाही. शिवाय तुझ्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी मी घेतली होती. मीच कुठेतरी कमी पडलो! तुझे असे रात्रभर बाहेर राहणे मलाही मुळीच आवडलेले नाही आणि तू कुठे गेली होतीस काय करीत होतीस याचा जाब विचारणे आमचे कर्तव्य आहे!

नैनीला वाटले होते की तिचे दद्दू तिची बाजू घेतील पण तसे झाले नाही. ती क्षणभर गोंधळून गेली मग म्हणाली,मी माझ्या मैत्रिणीच्या, सुमीच्या घरी होते.इतके म्हणून तिने पुन्हा आपल्याला कोंडून घेतले.

विजयलक्ष्मीला खूपच वाईट वाटले. तिचे डोळे पुन्हा भरून आले. सासर्‍यांनी तिची समजूत घातली.

घाबरू नकोस! हे वयात असे होते! ती वळणावर येईल! मी आहे ना!

पण विजयलक्ष्मीचे मन खूपच विचलित झाले होते. दुसर्‍या दिवशी ती दवाखान्यात गेली तेव्हा सर्वांच्या हे लक्षात आले.

दवाखान्यात एक डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून लागले होते. ते एकच डॉक्टर असे होते की ज्यांनी गेल्या दोन वर्षात एकही सुट्टी घेतली नव्हती. ते जॉईन झाले तेव्हा विजयलक्ष्मीने त्यांना विचारले होते,तुम्ही गायनॅक करून पुढे एफ.आर.सी.एस केले आहे! तुम्हाला सहज तुमची प्रॅक्टिस चालू करता आली असती! पुन्हा इतकी वर्षे तुम्ही इंग्लंडमध्ये काम केले आहे! माझ्या हॉस्पिटलमध्ये येण्याचे काय कारण?

मॅम! मला एक हॉस्पिटल चालवायची दगदग करायची इच्छा नव्हती. शिवाय पैसे कमावणे हे देखील माझे ध्येय नाही. तुमच्या हॉस्पिटलची ख्याती ऐकून मी इकडे जॉईन करायचा विचार केला.ते डॉक्टर नम्रपणे म्हणाले होते. जास्तीत जास्त 38 वय असेल त्यांचे.

विजयलक्ष्मी खुश झाली व त्यांची लगेच अपॉइंटमेंट झाली. ते एकटेच होते जे तिला ममा मॅम न म्हणता केवळ मॅम म्हणत.

त्यादिवशी त्यांनी तिची मनस्थिती हेरली. त्यांच्या लक्षात येईना की नेहमी शांत व हसतमुख राहणार्‍या या स्त्रीला काय झाले असावे! पण तिला विचारणे त्यांच्या अधिकारात नव्हते! इतके मात्र खरे की त्यांना विजयलक्ष्मी बद्दल विलक्षण आदर व आपुलकी होती. इकडे विजयलक्ष्मीच्या कानावर आले होते की डॉक्टर आलोक विधुर आहेत व आपल्या आईबरोबर राहतात. आपल्या कामात ते खूपच निपुण होते. तिलाही त्यांच्याबद्दल खूप आदर होता.

असेच काही दिवस निघून गेले. नैनीने घरी उशिरा बंद केले होते मात्र तिने आईशी अबोला धरला होता. विजयलक्ष्मी चे सासरे तिला सारखे धीर देत की सगळे ठीक होईल!

आणि मग तो दिवस उजाडला. विजयलक्ष्मीला एक इमर्जन्सी ऑपरेशन करायचे होते. बाई सिरियस होती व तिचे सिजेरियन करायचे होते. तिचे बी.पी खूप वाढले होते आणि पहिलेच बाळंतपण होते. डॉक्टर आलोक देखील ऑपरेशन थिएटरमध्ये होते. विजयलक्ष्मीची काहीच चूक नव्हती मात्र त्या महिलेने ऑपरेशन टेबलवरच प्राण सोडले! बाळ वाचले मात्र आई गेली! तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती मात्र नियतीपुढे तिचे काहीच चालले नव्हते! तिच्या हॉस्पिटलमधला तो पहिला मृत्यू होता आणि ती हादरून गेली. त्या बाईच्या कुटुंबियांना सांगताना जणू ती निष्प्राण झाली. तिला कोणीच दोष दिला नाही मात्र आईविना बाळाचे तोंड बघितल्यावर तिचे कशातच लक्ष लागेना.

आपल्या केबिनमध्ये येऊन तिने अश्रूंना वाट करून दिली. मॅम खूप वेळ बाहेर आल्या नाहीत… जेवायला देखील घरी गेल्या नाहीत… राऊंड वर गेल्या नाहीत, हे बघून स्टाफ चिंतित झाला.

डॉ.आलोक हिम्मत करून केबिनमध्ये गेले. त्यांनी दारावर नॉक केलेच नाही. विजयलक्ष्मी आपल्या टेबलावर डोके टेकून रडत होती.

त्यांनी हलकेच तिला हाक मारली, Mam! It’s okay! That’s life! Destiny! आपल्या हातात जितके होते तितके आपण केले! यात तुमचा मुळीच दोष नाही! त्या महिलेची स्थितीच तशी होती!

विजय लक्ष्मीने त्या संवेदनशील व्यक्तीचे बोल ऐकले आणि तिला अश्रू अजूनच अनावर झाले. आलोक तिच्याजवळ गेले व हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला!

नेमकी त्याचवेळी नैनी केबिनमध्ये आली आणि थक्क झाली! तिचा संताप अनावर झाला! आपल्या आईला सॉरी म्हणायला म्हणून ती आली होती आणि आपल्या ममाचा हात कोणा अपरिचित व्यक्तीच्या हातात बघून किंचाळली, ममा! काय चालले आहे?

विजयलक्ष्मीने काही बोलावे त्याआधी आलोक म्हणाले,बेटा! आईला थोडे समजून घे!

Don’t call me beta! You are not my father! नैनी किंचाळायला लागली.

आणि समज मी तुझ्या आईशी लग्न केले तर तुला काय म्हणू?आलोक ने विचारले.

Shut up! तुम्ही ममाला विचारले आहे का?नैनी अधिकच संतापली.

आता विचारतो!आणि वळून त्यांनी विजय लक्ष्मीला विचारले, Will you marry me?

हो! हा आवाज गुपचूप आत आलेल्या विजय लक्ष्मीच्या सासर्‍यांचा होता.

सुनबाई! हो म्हण! अशी संधी तुला पुन्हा मिळणार नाही! माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत!

विजयलक्ष्मी साठी हे सगळे कितीही आकस्मित असले तरी कधीतरी आलोकने तिच्या मनात घर केले होते. मनात दुविधा होती फक्त नैनीबद्दल.

तिचे सासरे पुढे आले आणि दोघांचे हात हातात घेऊन म्हणाले, Go ahead! नैनीची काळजी करू नका. तिला आज ना उद्या समजेल! हो की नाही नैनी?

एव्हाना नैनीच्या लक्षात आले होते की डॉक्टर आलोक केवळ तिच्या आईच्या चारित्र्याशी खेळत नव्हते!

ममा ! Go ahead! I will be happy for you! असे म्हणत तिने आपल्या आईला मिठी मारली!

समाप्त.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या