Sunday, November 24, 2024
HomeनाशिकBlog : शिक्षणप्रेमी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Blog : शिक्षणप्रेमी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व अनेकविध पैलूंनी व्यापलेलं आहे. आपल्या व्यापक चिंतनातून त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधीशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या विषयांमध्ये विपूल प्रमाणात तर्कशुध्द मांडणी केलेली आहे. शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा या क्षेत्रातील त्यांचा कृतीयुक्त व्यासंग, दैदिप्यमान म्हणून अधोरेखित आहे.

त्यांच्या व्यासंगातील एकेक पैलू अनुकरणीय आणि पथदर्शक असाच आहे. भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे.

- Advertisement -

बाबासाहेब हे स्वत: उच्च विद्या विभूषित होते. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महत्वाचा संदेश दिला. भारतातील बहुजन वर्ग अज्ञानात व गुलामगिरित जगत होता. शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो व त्याला त्याच्या हक्क व अधिकारांची जाणीव होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे मत होते.

शिक्षणविषयक सिद्धांतापैकी निसर्गवाद हा देखील एक पाश्‍चात विचारवंतानी मांडलेला सिध्दांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेत निसर्गवादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पध्दतीने रूजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत तसा कायदा केला. हजारो वर्षांची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढली. शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते, जातीवर नाही हा विचार त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेत रूजविला.

अमूक एक जातीचा म्हणून त्याला शिक्षणापासून दूर ठेवणे म्हणजे निसर्गनियमांचा भंग करणे होय हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम भारतात मांडला. शिक्षण व्यक्ती वैशिष्ट्याचा विकास करते ही बाब तथाकथित समाजाच्या लेखी नव्हती. शिक्षण घेण्यासाठी जात, धर्म, वय, लिंग हे भेद पुसले गेले. निसर्गवाद शिक्षणाचे ध्येय लोकनिष्ठ मानतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या ध्येयाला अनुसरून विचार मांडताना म्हणतात.

आपला व्यक्तीविषयक लौकीक वाढविणे व त्याबरोबरच आपल्या समाजाची योग्यता वाढविणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे. आध्यात्मवाद किंवा आदर्शवादाप्रमाणे शिक्षणाची उद्दिष्ट्ये परलोक प्राप्ती नसून स्वविकास आणि सामाजिक उन्नती असे असायला हवे. तरच शिक्षण खर्‍या अर्थात मानवोपयोगी ठरेल अशी सैद्धंतिक भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली.

शिक्षणात आमूलाग्र बदल आपल्या कर्तृत्त्वाचे प्रस्थापित करू पाहणारे बाबासाहेब, आज हयात नाहीत. ‘शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे, जो ते प्राशिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या सुभाषितापासून आजही कित्येक उपेक्षित बांधव शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. बदलत्या कालानुरूप त्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणं हा त्यांचा हक्क आहे. शिक्षणप्रेमी बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक ध्येय – धोरणांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असणं, हा आंबेडकरी चळवळीचा आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेचा ध्यास असायला पाहिजे, असे वाटते.

डॉ. आंबेडकरांचा शिक्षणातील निसर्गवाद म्हणजे केवळ निसर्गावर अवलंबून राहणे नव्हे तर निसर्गातील आपण एक घटक आहोत त्यानुसार इतरांवर अवलंबून आले. इच्छा आल्या, आकांक्षा आल्या मग त्या पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे लागतात आणि हेच निसर्गवादातील सत्य आहे. शिक्षणाचे मानवी जीवनातील स्थान, महत्त्व, ध्येय आणि उपयोगिता सिद्धांताच्या माध्यमातून मांडण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी काही पाश्‍चात्य व भारतीय अभ्यासकांनी ते विशद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचलित शिक्षणविषयक सिद्धांताचा प्रत्यक्ष जीवनाशी सहसंबंध जोडला. प्रचलित सिद्धांतात काही बदल सुचविले, नवा शैक्षणिक सिद्धांत मांडला. संपूर्ण मानवजातीला शिक्षणाची गरज, महत्त्व व उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन सत्याशी भिडणारा शाश्वत स्वरूपाचा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासंदर्भात अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता. प्राध्यापकांची कर्तव्ये काय असली पाहिजे? विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किती दिली गेली पाहिजे? यासंदर्भातील अतिशय सविस्तर तपशिल त्यांनी आपल्या एका लेखांतून मांडला आहे. हे संदर्भ कालातीत आहेत.

आजच्या बद्दलत्या काळातही ते अतिशय महत्वचे व मार्गदर्शक ठरणारे आहेत. शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. हे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही.

त्या दिशेने वाटचाल सुरू आहे ; परंतु भारतात शिक्षणाचे लोकशाहीकरण होत नाही; तोपर्यंत देशांत ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत भारत महासत्ता बनणार नाही.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात म्हंटले आहे की, तुम्ही आज ज्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करत आहत ,त्याचा संदर्भ बिंदू म्हणून बाबसाहेबांकडे पाहावे लागेल आणि ते तत्वतः अत्यंत रास्त आहे.
मृणाल पाटील

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या