Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमास्क

मास्क

लहानपणी केलेले, घातलेले विविध मुखवटे, जिम कॅरी नामक प्राण्याचा ‘मास्क’ सिनेमा आणि त्याच काळात मुलांकरता घेतलेले मास्क! त्यांनतर मास्क या प्रकाराशी सबंध आला तो थेट 2020 मध्ये, तब्बल पंचेवीस वर्षांनंतर! तेही ‘करोना’मुळे! नाही म्हणायला, पुण्यात ‘मास्क’धारी युवती दुचाकीवर कधीपासून दिसू लागल्या हा एक संशोधनाचा विषय ठरेल. तसे आम्ही आधीपासूनच हुशार! असो. तो विषयच वेगळा. अन्यथा मास्क हा प्रकार मी तरी सर्वात जास्त पाहिला तो सिनेमात.

हमखास मेलो, मेलोड्रामा घडताना ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर येणार, पांढरा झगा आणि गळ्यात अडकवलेला हिरवा मास्क! डायलॉग तर माहीतच आहे अशा वेळचे, पण त्यामुळे लाल दिवा ऑपरेशन थिएटरचाच आणि मास्क हा हिरव्या रंगाचाच आणि तो पण फक्त डॉक्टरच घालतात, असा समज झाला होता. अन्यथा मास्क घातलेली व्यक्ती बघितली तर सहानुभूतीच वाटायची प्रकृतीविषयी! तर असा हा मास्क आता मात्र पोशाखाचाच एक अविभाज्य घटक झाला आहे.

- Advertisement -

आधीची म्हण ’ You are not dressed till you wear smile on face’ आता मात्र ‘You are not dressed till you wear mask on face’ अशी सुधारित करावी लागणार आहे. आणि जसे चेहर्‍यावरचं हसू आपण नेहमीच विसरतो तसा, हो पण बाहेर जाताना हमखास विसरतो. अजून एक गोष्ट आली टोपी-चष्मासारखी हरवण्याजोगी, अडचणीची, पण सद्य परिस्थितीत आवश्यक. आता फिरायला गेलो. समोरून ओळखीचे कुटुंब येत होते. त्या गृहस्थांना आम्ही ओळखून हातवारे करतोय, पण त्यांना ओळखूच येईना. त्या बाई पण बघायला लागल्या. तरी बरे आमचे पण कुटुंब बरोबर होते.

शेवटी मास्कखाली करून ओळख दिली. तर म्हणतात अरेच्या तू होय? आता कोण समजत होते देव जाणे. आणि म्हणूनच कोणीतरी आपलाच चेहरा मास्कवर स्क्रीन प्रिंट करून द्यायची शक्कल काढली आहे बहुतेक! या मास्कपायी, मास्क घालून, त्यावरूनच फुलाचा वास घेणे, घरातून निघतांना मास्क घातला हे विसरून लवंग, सुपारी मास्क वरूनच खायचा प्रयत्न करणे असे बरेच किस्से! मावा किंवा गुटका खाणार्‍यांनी किती मास्क खराब केले असतील देव जाणे.

आता मास्क म्हणजे एक अडचणच! आणि आम्ही प्रचंड हुशार! आम्ही मास्क घालतच नाही, शूरवीर सरदार आम्ही तर काही शिलेदार हेल्मेट गाडीला अडकवल्यासारखे गळ्यात मास्क अडकवून फिरतात. काही युवती तर मास्क म्हणजे जणू पर्सच समजून मस्त हातात फिरवत चालतात. एका साहेबाने तर मला ऐकवले…. सकाळी मास्क घालू नका. प्राणवायू मिळत नाही. सकाळनंतर दिवसा कधीही घाला. नंतर प्राणवायूचे काय होते देव जाणे. काही मंडळी मास्क हा कपाळावर किंवा मानेला सुरक्षा असल्यासारखे अडकवतात तर काही चक्क लायसेन्स किंव्हा रुमाल असल्यासारखे छान घडी घालून खिशात ठेवतात व्यवस्थित.

आपले नावीन्य आणि कल्पनाविलास यास काही तोड नाही. त्यात मास्क पण मागे नाही. रंगीबिरंगी, डिझाईनचे मास्क किंवा डिझाईनर्स मास्क… सर्वच प्रकार अवतरले. आता त्याचे ड्रायक्लिनिंगचे वेगळे दर ठरवत असेल कोणी. अंबानी, अदानी यांचे मास्क तर काय सोन्याचेच राहतील, नाही? काही दिवसांत पीएनजी, तनिष्कच्या येतील जाहिराती! नवरा-नवरीकरता विषेश मास्क! मात्र नट-नट्या काय करतील हे बघणे मजेचे असेल. एक मात्र खरं, डायपर युग यायच्या आधी वाळत घातलेल्या दुपटी, लंगोट पाहिल्यावर घरी लहान बाळ आहे हे कळायचं. आता गॅलरीतल्या मास्कवरून कळते की किती प्रकारचे आणि मॅचिंग मास्क आहेत ते. माणसं पण मिटिंगमध्ये, टायऐवजी योग्य मास्क घालतील. दुसरे नावीन्य म्हणजे मास्क कसा करावा? हसत-खेळत मास्क करायला शिका, अशी जाहिरात येणेच शिल्लक आहे.

कल्पकता धो-धो वाहून जाऊन शर्ट, टी शर्ट पासून तर सर्वच बाहेरच्या, आतल्या जुन्या, नव्या कपड्यांचे मास्क कसे करावेत याचे एव्ही आले. बिकिनीपासून त्रिकिनी पण तयार झाली.एन 95, सर्जिकल हे शब्द सर्रास वापरले जाऊ लागले. शेवटी मात्र, अरे हातरुमाल पण चालतो म्हणू लागले. त्यातून सिगारेट, पेयपान याची पण सोय असलेले मास्क आले. रुमाल, पर्स, कपड्याबरोबर आता मास्कचे पण स्टॉल दिसत आहेत. ‘मास्क’ नावाची नवीनच इंडस्ट्री तयार झाली. काही दिवसांनी त्यावर पण जीएसटी लावला नाही म्हणजे मिळवली.

अजून एक नशीब आपले, निवडणुका नाहीत आत्ता. कुठल्याच पक्षांनी ही संधी सोडली नसती, नाही का? विचार करा, आआपा पक्षाचे चिन्ह म्हणजे डायरेक्ट तोंडावर झाडू! वाघ, सिंह, हत्ती, घड्याळ, कमळ सर्वच मास्कवर विराजमान झाले असते. कुठलीही नवी गोष्ट आली की पाट्या पण आल्या. ओले मास्क कोरड्या कचर्‍यात टाकू नयेत.

कृपया आपला मास्क टेबलवर ठेऊ नये. आपला मास्क आपल्याजवळच ठेवावा, मास्क बाजूला करून शिंकू नये, अशा पाट्यांचा पण उगम होतोय. दोन नवीन समस्या… मास्कची विल्हेवाट कशी लावायची आणि दुसरे पावसात मास्क भिजणार त्याचे काय? तर असा हा मास्क अचानक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे, पण काय करणार? ‘करोना नको; तर मास्क वापर’ या वचनाने सर्वच मास्काधीन झालो आहोत.

लेखक परिचय :

* किरण वैरागकर – यंत्र अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेत शिक्षण.

* ऑटोमोटिव्ह, वाहन क्षेत्राच्या संशोधन आणि विस्तार, नवीन उत्पादन प्रकिया विभागात 35 वर्षांहून अधिक काळ कार्यरत.

* इंजिन, कार, ट्रक, बस यावर विशेष काम. सध्या ऑटोमोटिव्ह कॅन्सल्टंट म्हणून स्वतःच्या कंपनीत काम.

* भारतासह सर्वत्र कामानिमित्त आणि पर्यटन म्हणून भटकंती.

* लेखन, छायाचित्रण यात अजूनही शिकाऊ, हौशी, पण लिहिण्या-वाचनाची आवड.

* नाशिकच्या ‘पडसाद’ या कर्णबधीर शाळेशी निगडित. विशेषत: त्यांच्या व्यावसायिक गुणवत्ता आणि स्वावलंबनावर भर.

—————————————-

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या