नगरी पावसाची रूपे अनेकजलसंपदेचा मूळ स्त्रोत पाऊस! त्याचे काही प्रकार ग्रामीण भागातील म्हणजे नगरी किंवा श्रीगोंद्याच्या भाषेत लहानपणी ऐकलेले आहेत. त्यांची फक्त कल्पना द्यावी हा मानस आहे. त्या पावसाचे काही प्रकार व त्यांची माहिती प्रस्तुत लेखात दिली आहे….
जलसंपदा विभागात 25 वर्षे नोकरी करुन मी टप्प्याटप्प्याने मुख्य अभियंतापदावर पोहोचलो आहे. त्याचबरोबर ‘हायड्रॉलॉजी’ म्हणजे जलविज्ञानातच पीएच.डी (डॉक्टरेट) करण्याचीही संधी मिळाली, पण गावाकडील भाषेत पावसाची वेगवेगळी रूपे आणि त्यांना दिल्या गेलेल्या नावांचे ज्ञान मला शेतकरी कुटुंबात जन्मल्याने मिळाले.
जलाची संपदा येते कोठून? महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास फक्त आणि फक्त पावसापासूनच ही जलसंपदा आपल्याला मिळते. महाराष्ट्रासारख्या प्रदेशात वर्षात सुमारे 96 तास पाऊस पडतो. म्हणजे साधारणत: सलग घेतला तर 4 दिवस! या 4 दिवसांत पडणारा पाऊस आपल्याला 365 दिवस वापरायचा असतो. त्यासाठी सरकारने जलसंपदा आणि पाण्याशी निगडीत खाती निर्माण केली. असो.
जलसंपदेचा मूळ स्त्रोत पाऊस! त्याचे काही प्रकार आमच्या ग्रामीण भागातील म्हणजे नगरी किंवा श्रीगोंद्याच्या भाषेत मी लहानपणी ऐकलेले आहेत. त्यांची फक्त एक कल्पना द्यावी हा मानस आहे. पावसाचे काही प्रकार आणि त्यांची माहिती प्रस्तुत लेखात दिली आहे.
बुरबूर किंवा भूरभूर
हा पाऊस म्हणजे अगदी पुणेरी भाषेत रिमझिमपेक्षा थोडा कमी आणि स्प्रे करणारा तशा प्रकारचा! हा पाऊस साधारणपणे जुन-जुलैत पडतो. त्याच्यात आर्द्रता कमी असते आणि ड्रायनेस असतो किंवा अजून बराच पाऊस पडायचा असताना तो पडतो.
बुरंगाट पाऊस
हाही भूरभूर पावसासारखाच प्रकार आहे. परंतु त्याचे थेंब खूपच छोटे असतात. पावसाळयाच्या शेवटी जेव्हा बर्यापैकी हिरवळ झालेली असते, आर्द्रता असते, जमिनीत ओलावा असतो त्यावेळी पडतो तो बुरंगाट पाऊस!
रिपरिप पाऊस
रिपरिप हा भूरभूरपेक्षा थोडासा जास्त असणारा पाऊस; परंतु संततधार पडणारा पाऊस! हा पाऊस कमी इन्टेन्सीटीने पडणारा पाऊस असतो. रिपरिप पावसाने दलदल किंवा बर्यापैकी ओलावा झालेला असतो. पिके हिरवीगार झालेली असतात. हा पाऊस शेतकर्यांना अनावश्यक असताना पडतो.
रपारपा किंवा रापराप
हा पाऊस शहरी भाषेत मुसळधार स्वरुपाचा म्हणता येईल. जो येतो धाड-धाड-धाड पडतो आणि निघून जातो. तसेच बर्यापैकी नुकसान करतो. छोट्या भाजीपाल्यांची पाने तोडून टाकतो. शेतातील वाफे सपाट करतो आणि जमिनीची ठोकणी पण होते. मऊ जमिनीला तो कठीण करुन जातो.
वाव्हणी पाऊस
ज्या पावसामुळे नांगरणी किंवा मशागत केलेल्या शेतातून पाणी वाहू शकते, बाहेर पडते, अशा पावसाला ‘वाव्हणी’ म्हणतात. साधरणपणे एक तासात 25 मि.मी.पेक्षा जास्त पडणार्या पावसाला वाव्हणी म्हणता येईल.
पेंड वलता पाऊस
शेतातील मातीतून चालले तर पायाला किंवा चपलेला चिखल चिकटतो, ग्रामीण भाषेत त्याला पेंड म्हणतात. म्हणजे पायाला किंवा चपलेला माती चिटकून येईल एवढी जमीन ओली करणारा पाऊस म्हणजे ‘पेंड वलता पाऊस’! हा पाऊस जमिनीत साधारणपणे एखादा इंच ओलावा करतो.
वापसापुरता पाऊस
जमिनीचा वापसा होणे म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर त्याच्यात पेरणीची पाभर चालू शकणे. पेरणीची पाभर चालण्यासाठी जमिनीची ओल तर असावी लागते. माती सॉफ्ट लागते. परंतु चिखल नसावा जेणेकरुन जनावरांना, माणसांना त्यात पेरणी करताना त्रास होणार नाही. ज्याला ऑप्टिमम मॉईश्चर कन्टेंट म्हणता येईल. म्हणजे जमिनीत बियाणे पेरले तर उगवून येईल एवढी ओल असावी, पण चिखल किंवा रिपरिप नसावी. अशा प्रकारचा जो पाऊस पडतो त्या प्रकाराला ‘वापसापुरता पाऊस’ म्हणतात.
सलाईनसारखा पाऊस
‘क्रॉप वॉटर’ म्हणजे पिकाच्या मुळांपुरताच पाऊस पडतो. पाणी वाहत नाही. खोल झिरपत नाही. परंतु पिके मात्र टवटवीत येतात. कारण पिकांना पाहिजे त्यावेळेस आणि पाहिजे तेवढा पाऊस मिळतो. सलाईनवर माणूस जिवंत राहतो; तशा ऑप्टिमम पावसाला ‘सलाईनसारखा पाऊस’ म्हणतात.
पन्हाळी पाऊस
नगर जिल्हयात पूर्वी मातीच्या धाब्याची घरे असायची. त्या धाब्याच्या घरांना ड्रेन आऊट करण्यासाठी मातीच्या स्लॅबवर पन्हाळी ठेवलेली असंत. त्या पन्हाळ्यांमधून पाणी बाहेर पडले की, त्याला ‘पन्हाळी पाऊस’ म्हणतात. साधारणपणे 10-15 मि.मी. पावसाला पन्हाळी पाऊस म्हणता येईल. ही सर्व मोजमापे मी माझ्या अंदाजाने दिलेली आहेत. शेतकरी त्यांच्या नजरअंदाजाने ठरवतात.
कुडंमुडं पाऊस
हा पाऊस एकाच गावाच्या एका कोपर्यात पडला तर दुसर्या कोपर्यात पडत नाही. एका शेतात पडतो तर दुसरीकडे पडत नाही. अशा पध्दतीच्या पावसाला ‘कुडंमुडं पाऊस’ म्हणतात.
आखाड पहाळी
आषाढ-श्रावण महिन्यांत पश्चिमेकडून वारा येतो. त्याच्याबरोबर ढग येतात. ढगांबरोबर पावसाची सर येऊन जाते. त्याला ‘आखाड पहाळी’ म्हणतात.
पावसाचे हे प्रकार मला लहानपणी शेतावर आई-वडिलांबरोबर, भावाबरोबर काम करताना प्रत्यक्षात मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहेत. ते कोणत्याही पुस्तकात नाहीत. मी डॉक्टरेट झालो तरी मला ते कोणी शिकवले नाहीत. मुख्य अभियंता झालो तरी ते माझ्या कुठे वाचनात आले नाहीत.
हे प्रकार आणि ज्ञान कदाचित पुढे लुप्त होऊ शकते. म्हणून तो शब्दबद्ध करण्याचा हा खटाटोप आहे. काल आणि स्थलपरत्वे या प्रकारांच्या व्याख्येत किंवा विश्लेषणात फरक पडू शकतो. परंतु प्रत्येक भाषेत किंवा प्रत्येक भागात जनसामान्यांना कल्पना होण्यासारख्या शब्दांनी तयार झालेली ही ग्रामीण मराठी भाषा आहे.
नागराज मंजुळे म्हणतात त्याप्रमाणे, भाषा हे आपले म्हणणे व्यक्त होण्यासाठी किंवा आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते समोरच्याला कळण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. यात शुध्द-अशुध्द काही नसते. हेच यावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यासारखे वाटते.
– डॉ. हेमंत धुमाळ,
मुख्य अभियंता (वि. प्र.),
कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे