यंदाचा रब्बी हंगाम संपत आला आहे. रब्बीच्या पिकाच्या पाण्यासाठी नुकतेच भंडारदरा धरणातून पहिले रब्बीचे आवर्तन संपले. या आवर्तनात शेतकर्यांनी पाटपाण्याकडे पाठ फिरविली. पाणी मागणीचे 7 नंबरचे नुमना अर्ज दाखल करण्यासाठी तीनवेळा मुदतवाढ देवूनही शेतकरी पाटबंधारे कार्यालयाकडे साधे फिरकलेही नाही.
उत्तर नगर जिल्ह्याची शेती मुळातच भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाटपाण्यावर फुलली आहे. परंतू सन 2005 च्या समन्यायी पाणीवाटप कायद्याने पाण्याची पळवा पळवी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जायकवाडीला सोडले गेले. त्याने नगर-नाशिक जिल्ह्याविरुध्द मराठवाडा असा पाण्याचा संघर्ष सुरु झाला. त्याचा फटका या परीसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे.
त्यामुळे पाण्यासाठी या परीसरातून फार मोठा संघर्षही उभा राहीलेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर शेती केली जात असली तरी नोव्हेंबर महिन्यातील रब्बी हंगाम व उन्हाळ हंगामात धरणातून शेती आवर्तन होत असल्याने पिकांची परिस्थिती चांगली रहाते. ऐरव्ही आवर्तन काळात मोठे तंटे वादविवाद होत असतात.
गेल्या खरीप हंगामात सप्टेबर व आक्टोबर महिन्यात उत्तर नगर जिल्ह्याला वरदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे धरणे ओसंडून वाहीले अन् त्यातच परीसरातही सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने संपुर्ण शेती क्षेत्र सुमारे दोन महीने पाण्याखाली होते. त्याचे परिणाम स्वरुप भुगर्भात पाणी पातळीत मोठी वाढ झाली. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रब्बी हंगामाची तयारीही एक ते दिड महिन्याने सुरु झाली. रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातून केली जात नव्हती.
त्यातच भंडारदरा व निळवंडे धरण काठोकाठ भरलेले असल्याने शेती आवर्तन सोडण्याचा जलसंपदा विभागाने कार्यक्रम तयार केला. दरवर्षी नोहेंबर महिन्यातच रब्बीचे पहिले आवर्तन केले जाते. मात्र, यंदा जानेवारी संपून फेब्रुवारी महिना मध्यावर आला आहे. तरी देखील आवर्तनाची मागणी होत नसल्याने जलसंपदा विभागाने पाणी अर्ज दाखल करण्याचे दोन वेळा आवाहन केले.
या आवाहनाला शेतकर्यांनी प्रतिसाद न दिल्याने जलसंपदाने जानेवारी महिन्यात 30 दिवसांचे शेती आवर्तन सोडण्याचा निर्णय घेवून आवर्तनही सुरु केले. श्रीरामपूर तालुक्यात पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद दिला. प्रथमच शेतकर्यांनी पाटपाण्याला टाटा केल्याने कालवा निरीक्षकांवर पाणी घेता काहो पाणी म्हणण्याची वेळ या आवर्तनाच्या वेळी आली.
श्रीरामपूर तालुक्याचा परिसर हा पर्जन्यछायेच्या भागात येतो. त्यामुळे या परिसरात नेहमी अत्यल्प पाऊस पडतो. या भागातील शेती व्यावसाय हा भंडारदरा धरणाच्या पाण्यावरच बहरलेली आहे. नशिबाने या पावसाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भुगर्भातील जलपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
त्यामुळे या आवर्तनामध्ये शेतीसाठी पाणी घेण्याची वेळ शेतकर्यांवर आली नाही. शेतकर्यांनी 7 नंबरचे फॉर्म भरण्याकडेही कानाडोळा केला. परंतू प्रत्येकवर्षी समाधानकारक पाऊस होईलच असे नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पाणी मागणी अर्जाकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात भंडारदरा धरणाच्या पाण्यावर हक्क सांगता येणार नाही.एकदा हे पाणी शेतीशिवाय दुसरीकडे वळविले तर पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येईल.
– दिपक उंडे
8788239170