Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधविधानसभेचे फुंकले रणशिंग

विधानसभेचे फुंकले रणशिंग

पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसर्‍याच दिवशी गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसचे खच्चीकरण करण्याची व्यूहरचना भाजपतर्फे गुजरातमध्ये केली जात आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न चालवला असल्याने वातावरण बहुपेडी बनत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी यांनी गुजरातचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. या शो दरम्यान लाखो लोक उपस्थित होते. यावेळी लोकांनी ‘मोदी-मोदी, जय श्री राम आणि भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. अहमदाबाद विमानतळावरून नऊ किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर मोदी भाजप कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. मोदी यांनी राज्य भाजप मुख्यालयात सरकार आणि संघटनेचे नेते, भाजप खासदार आणि आमदारांशी चर्चा केली. ‘मेरा गाव, मेरा गुजरात’ कार्यक्रमात राज्यातले सव्वा लाख सरपंच उपस्थित होते. तालुका आणि जिल्हा पंचायत, नगरपालिका सदस्यांना त्यांनी संबोधित केले. खेळ महाकुंभाची सुरुवात केली. महिलांचा मेळावा घेतला. खेळ महाकुंभात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या 46 लाख युवक-युवतींनी नोंदणी केली होती. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलून मध्यंतरी सरकार विरोधातली नाराजी कमी करण्यात आली. कर्नाटक, मध्य प्रदेशबरोबरच गुजरातमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम राबवण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये बाळासाहेब थोरात आणि राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगले यश मिळवले होते. भाजपला सत्तेत येण्यासाठी कसरत करावी लागली; परंतु निवडून आणलेल्या आमदारांना सांभाळता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. गुजरात काँग्रेसमधली गटबाजी संपायला तयार नाही.

गुजरातमधले कॉम्ग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी एकूण परिस्थितीबाबतची व्यथा बोलून दाखवली होती. भाजपच्या अपयशाचे भांडवल करण्याइतकीही ताकद काँग्रेसमध्ये राहिलेली नाही. या वर्षाअखेर गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असताना काँग्रेसला आलेली ग्लानी अजून दूर झालेली नाही. शंकरसिंह वाघेला पुन्हा काँग्रेसमध्ये आले असले, तरी त्यांचा फारसा फायदा होणार नाही. काँग्रेसचे चाणक्य समजले जाणार्‍या अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. संपूर्ण गुजरातचे नेतृत्व करेल असा एकही नेता काँग्रेसकडे उरलेला नाही. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ‘आप’ने चालवला आहे. आम आदमी पक्षाने राज्यात तिरंगा यात्रा काढली. ‘आप’ गुजरातमध्ये एक नवीन पर्याय ठरेल, असे या पक्षाचे निमंत्रक गोपाल इटालिया आणि राज्याचे नेते इशुदान गढवी यांनी सांगितले. सुरत महापालिकेत मिळालेल्या जागांमुळे गुजरातमध्ये भाजपला ‘आप’ हाच पर्याय राहील, असा दावा केला जात आहे. पंजाबमध्ये मतदारांनी आम आदमी पक्षाला संधी देऊन नवे राजकारण सुरू केले आहे, यातून देशात क्रांती होणार असल्याचे ‘आप’चे नेते सांगत आहेत.

- Advertisement -

सुरत आणि गांधीनगर महानगरपालिकेत चांगली कामगिरी केल्याने ‘आप’चं गुजरात युनिट खूप उत्साही होतं; परंतु सुरत महानगरपालिकेतले ङ्गआपफचे नगरसेवक आणि अन्य ज्येष्ठ नेते महेश सवानी, विजय सुवाला आदींनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाला ब्रेक लागला. पंजाबमधल्या विजयाने गुजरातमध्ये पक्षाला जणू बूस्टर डोस मिळाला. गुजरात विधानसभेसाठी पक्षाने पुन्हा एकदा पूर्ण उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या वर्षात भाजप आणि काँग्रेस पक्ष एकमेकांचे आमदार आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. भाजपचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं काँग्रेस नेते सुखराम राठवा यांनी सांगितल्यावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला म्हणाले की, काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. राजस्थानचे अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागार संयम लोढा यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या डझनभर आमदारांवर भाजपचा डोळा असल्याचे विधान केल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. तेव्हापासून गुजरात काँग्रेसच्या राजकारणात पलटवार सुरू आहे. गुजरात विधानसभेतले विरोधी पक्षनेते सुखराम राठवाही मागे राहिले नाहीत आणि म्हणाले की काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अनेक आमदार आणि भाजपचे अनेक आमदार आपले तिकीट कापले जाण्याच्या भीतीने काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

राठवा हे अत्यंत अनुभवी आणि राजकारणातले कुशल खेळाडू आहेत, ते प्रत्येक विधान अतिशय विचारपूर्वक करतात. अशा परिस्थितीत काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांचे पुनरागमनही खरे ठरू शकते. गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 182 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट घेऊन रिंगणात उतरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी तिकिटासाठी कोणताही नेता किंवा आमदार दावा करणार नसल्याचे अनेक वेळा सूचित केले आहे. पक्ष ज्या नेत्याला तिकीट देईल त्याला विजयी करणे हे त्या त्या नेत्यांचे कर्तव्य असेल, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी गुजरातमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात विरोधकांची उपस्थिती कायम राहावी यासाठी धनानी यांनी राज्यातल्या जनतेला काही जागा भाजपला द्यायचे आवाहन केले. त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जात आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते डॉ. मनीष दोशी यांच्या मते भाजप उघडपणे फोडाफोडीचे राजकारण करत आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याचा पक्षामध्ये समावेश करणार नसल्याचे भाजपने अलिकडे सांगितले होते; मात्र आता हा पक्ष काँग्रेसी नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा दावा करत आहे. मात्र, मंत्रिपद गमावून तिकीट न मिळण्याच्या भीतीने भाजपचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये परतण्याची वाट पाहत असल्याचा दावाही दोशी यांनी केला आहे.

दुसरीकडे, प्रसिद्ध उद्योजक आणि पाटीदार समाजाचे समाजसेवक नरेश पटेल यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार ‘आप’ करत आहे. आम आदमी पक्षाचे (आप) पुढील लक्ष्य गुजरात आहे. त्यामुळे त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू आहे. दिल्ली दौर्‍यानंतर नरेश पटेल ‘आप’च्या संपर्कात असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे. पक्ष त्यांचा दर्जा वाढवू शकतो आणि गुजरातमध्ये प्रवेशाचे दार उघडण्यासाठी त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवू शकतो. अलीकडेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनीही खुले पत्र लिहून नरेश पटेल यांना राजकारणात येऊन समाजसेवा करण्याचे आवाहन केले होते. नरेशभाई हे पाटीदार समाजाच्या खोडलधाम ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे राजकोटजवळ सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून माँ खोडलचे मंदिर बांधले गेले. आपला समाज म्हणाला तरच राजकारणात उतरू, असे ते सांगत आहेत. सरदार पटेल ग्रुप आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समिती या पाटीदार समाजाच्या दोन प्रसिद्ध संघटना त्यांनी राजकारणात येण्याच्या बाजूने आहेत. काँग्रेस नेते भरतसिंह सोळंकी यांनी नरेश पटेल यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते; मात्र त्यांना कोणतीही घाई नाही. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करावा, असे काहींचे म्हणणे आहे. एकंदरीत, गुजरातमध्ये सध्या भरपूर आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपला पर्याय देण्याचे सामर्थ्य कोणत्याही पक्षात दिसत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या