Friday, January 23, 2026
HomeराजकीयBJP News : भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा दणका! प्रचार गीतावर आक्षेप, कारण...

BJP News : भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा दणका! प्रचार गीतावर आक्षेप, कारण काय?

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ शेवटचे सात दिवस शिल्लक असतानाच, भारतीय जनता पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला आहे. भाजपच्या अधिकृत प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ शब्दाचा वापर केल्याने आयोगाने या गीताच्या प्रसारणाला परवानगी नाकारली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष प्रचार गीत तयार केले होते. मात्र, या गीतातील शब्दांवर निवडणूक आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आचारसंहितेच्या नियमांनुसार, प्रचारात धार्मिक भावना किंवा विशिष्ट रंगांचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्यावर निर्बंध आहेत. भाजपच्या या गीतात ‘भगवा’ शब्दाचा उल्लेख आल्याने हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे या गीताच्या प्रसारणावर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.

YouTube video player

हे प्रचार गीत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांनी गायले आहे. शेवटच्या सात दिवसांच्या प्रचारात हे गीत मुंबईतील गल्लोगल्ली वाजवून मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची योजना होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या ‘रेड सिग्नल’मुळे भाजपच्या प्रचार मोहिमेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आता भाजप या गीतात बदल करणार की कायदेशीर मार्ग अवलंबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत आहे. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्यावर एकत्र येऊन भाजप-शिंदे गटाच्या युतीला आव्हान देत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये २५ वर्षांनंतर युती झाली असून त्यांनी ६२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या नव्या समीकरणांमुळे मुंबईत सत्ता कुणाची येणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवडणूक १५ जानेवारीला होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. भाजप आणि शिंदे गटाने मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली असतानाच, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपला आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असताना झालेली ही कारवाई भाजपसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...