मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, याच प्रचारादरम्यान महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. चेंबूरमधील एका प्रचार रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी चक्क ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्यामुळे शिंदे गट कमालीचा संतापला असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
मुंबईतील चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. येथे शिंदे गटाच्या उमेदवार पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुस्कर यांच्यात ‘मैत्रीपूर्ण लढत’ होत आहे. गुरुवारी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रभागात उतरले होते. मात्र, दोन्ही गट समोरासमोर येताच भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचण्यासाठी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत केवळ ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे नेते शिंदे गटावर टीका करण्यासाठी या घोषणेचा वापर करत होते. मात्र, आता सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच या घोषणा दिल्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिरसाट म्हणाले की, “कुठल्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या हे मला ठाऊक नाही, पण अशा घोषणा देण्यापूर्वी आपल्या नेत्यांना (देवेंद्र फडणवीस) एकदा विचारायला हवे होते. आज आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका. ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांची संस्कृती कुठे गेली?” असा बोचरा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी घोषणाबाजी करणारे भाजप कार्यकर्ते दत्ता केळुस्कर यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, “आमच्याकडून कदाचित चुकीचे शब्द वापरले गेले. संपत्तीच्या जाहीरनाम्यानुसार ‘५० खोके’ नव्हे तर ‘११ खोके एकदम ओके’ अशी घोषणा द्यायला हवी होती. ११ कोटींची ही जंगम मालमत्ता नेमकी आली कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घोषणा वैयक्तिकरीत्या उमेदवार आणि त्यांच्या पतीपुरती मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुतीमधील या अंतर्गत वादामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.




