Monday, January 19, 2026
HomeराजकीयPrakash Mahajan : प्रकाश महाजनांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; म्हणाले, "राऊतांची बुद्धी भ्रष्ट,...

Prakash Mahajan : प्रकाश महाजनांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; म्हणाले, “राऊतांची बुद्धी भ्रष्ट, ठाकरेंचेच नगरसेवक…”

मुंबई । Mumbai

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, सत्ताधारी महायुतीने अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला आहे.

- Advertisement -

या विजयामुळे भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला २९ जागांवर यश मिळाले आहे. महायुतीच्या या विजयामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असली, तरी निकालांनंतर आता नगरसेवकांच्या संभाव्य ‘फोडाफोडी’वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

YouTube video player

मुंबई आणि इतर ठिकाणचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. महायुतीने आपल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवल्याच्या चर्चेवरून राऊत यांनी सवाल उपस्थित केला. “आमचे सर्व नगरसेवक सुरक्षित असून ते आपापल्या घरी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना कोणत्या धास्तीपोटी कैदखान्यात डांबून ठेवले आहे?” असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

राऊत यांनी पुढे असा खळबळजनक आरोप केला की, एकनाथ शिंदे आता चक्क आपल्याच मित्रपक्षाचे म्हणजेच भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र केवळ मुंबईतच नाही, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही पाहायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. निकालांनंतरही नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून त्यांना एकत्र ठेवण्याची वेळ महायुतीवर का आली, असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या टीकेला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. महाजन म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी अहोरात्र कष्ट केले आहेत, त्यामुळे विजयानंतर त्यांना एकत्र आणण्यात आले आहे. “आमचे कोणतेही नगरसेवक फुटणार नाहीत, उलट ठाकरेंचेच नगरसेवक आमच्याकडे येण्याची शक्यता अधिक आहे,” असा दावा त्यांनी केला.

प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हटले की, मुंबई महानगरपालिका आता त्यांच्या हातातून निसटली आहे. “आता ‘मातोश्री २’चे मेंटेनन्स कसे करायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे, म्हणूनच ते असे आरोप करत आहेत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच संजय राऊत यांच्यावर वैयक्तिक टीका करताना त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचेही महाजन म्हणाले.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युती अत्यंत भक्कम असल्याचे स्पष्ट करत महाजन यांनी सांगितले की, केवळ मतभेद निर्माण करण्यासाठी काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही समजूतदार असून ते एकत्रितपणे योग्य निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारस म्हणून स्वीकारले आहे, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “आम्ही शब्दाचे पक्के आहोत, २०१९ सारखा विश्वासघात आम्ही करणार नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

ताज्या बातम्या

प्रणिती

Praniti Shinde: “झुकना हमारी फितरत नहीं, दो कदम”; निवडणुक निकालानंतर प्रणिती...

0
सोलापूर | Solapurसोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये...