मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. या बजेटमधील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. विकासकामांसाठी ठेवी मोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसेच चित्र आता पाहायला मिळत आहे.
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा राहणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प 80952.56 कोटींचा इतका असणार आहे. २०२४-२५ च्या तुलनेत यंदा 8.77% ने वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. २०२५-२६ चा अर्थसंकल्प 74427.41 इतका अंदाजे अर्थसंकल्प होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मधल्या काळात महापालिका निवडणुका झाल्या नसल्याने ४ वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
मागील आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ४३१५९.४० कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते आता १४६७७८.१२ कोटी असे सुधारण्यात आले आहे. या अंदाजामध्ये ८.३८% म्हणजेच ₹३६१८.७२ कोटी इतकी वाढ झाली आहे. ३१.०१.२०२६ पर्यंत ३४०३३.५६ कोटी रुपये इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झालं आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न ₹५१५१०.९४ कोटी इतके प्रस्ताविण्यात आले होते. ते सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १९.३५% ने जास्त आहे.




