Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई विमानतळावरील पाट्या मराठीत झळकणार

मुंबई विमानतळावरील पाट्या मराठीत झळकणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

मुंबई विमानतळावरील सुचना फलक इंग्रजी ,हिंदी बरोबरच मराठीत ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेतला असून मार्च 2024 पूर्वी त्याची पूर्तता केली जाईल अशी हमीच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. याची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती डॉ.आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दखल घेत याचिकेची सुनावणी नोव्हेबरपर्यंत तहकूब ठेवली.

राज्यात सर्व दुकानावरील फलक मराठीत लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी असलेले फलक आणि सूचना फलकांवर इंग्रजी भाषेच्या बरोबरीने हिंदी आणि प्रादेशिक भाषेचा वापर करण्याचे आदेश देणार्‍या केंद्रीय गृह मंत्रालय व राजभाषा विभागाच्या दोन परिपत्रकांची विमानतळावर अंमलबजावणी करण्याचेअदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडला निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका गुजराती विचार मंच या ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती डॉ.आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी विमानतळावरील अनेक फलकांवर केवळ इंग्रजी भाषा असून मराठी आणि हिंदी भाषेचा वापर टाळला जात आहे.काही ठिकाणी इंग्रजीच्या तुलनेत मराठी आणि हिंदी भाषेचा मजकूर लहान आकारात आहे. त्या फलकांवरील मराठी वाचणेही मुश्किल होते , याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने स्नेहल दुखले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावरील सर्व फलकांवर मराठीला पहिले स्थान दिले जाईल, मराठीतील नावे आणि सूचना ठसठशीत दिसतील. त्या अनुषंगाने फलकांमध्ये आवश्यक तो बदल करण्याचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करू, अशी हमी प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने संबंधित कार्यवाहीचा प्रगत अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी नोव्हेंबर 2023 पर्यंत तहकूब ठेवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या