बोधेगाव । प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाडगव्हाण रस्त्यालगत असलेल्या चार वेगवेगळ्या वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवत मोठा दरोडा टाकला आहे. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोधेगाव येथील बाडगव्हाण रोड परिसरात कचरू श्रीपती खिळे हे आपल्या कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहतात. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने खिळे वस्ती आणि वैद्य वस्तीला लक्ष केले. दरोडेखोरांनी सुरुवातीला अप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी घरातील सदस्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी तलवार आणि चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरोडेखोरांनी अत्यंत क्रूरपणे घरातील महिला आणि पुरुषांना मारहाण केली. या दहशतीच्या जोरावर त्यांनी घरातील कपाटे आणि तिजोऱ्या फोडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. एकामागून एक चार वस्त्यांवर हा हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तीन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB), श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले असून, दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या भीषण दरोड्याच्या घटनेमुळे बोधेगाव आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. शेतात वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, ते आता थेट वस्त्यांवर घुसून हल्ले करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.




