नंदुरबार | प्रतिनिधी – NANDURBAR
खापर ता. अक्कलकुवा (Akkalkuva) येथे कृषी विभागाने छापा टाकून तब्बल २ लाख ४ हजार रुपये किमतीचे बोगस बियाणे (seed) जप्त केले आहे. सदर कारवाई परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पुलकित सिंग यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन बियाणे जप्त करण्यात आले आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील मे.मिराई ऍग्रो एजन्सी या दुकानात अनधिकृत एच.टी.बी टी. कापूस बियाणे वाहतूक, साठवणूक व विक्री होत असल्याबाबत गुप्त माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने मे.मिराई ऍग्रो एजन्सी खापर येथे धाड टाकली.
सदर दुकानाची तपासणी केली असता दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर सीलबंद तीन पोते बियाणे आढळून आले. सदर बियाण्याबाबत दुकानाचे मालक गणेश मनोज मराठे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. भरारी पथकाने सदर पोते उघडले असता त्यात २ लाख ४ हजार ४०० रुपये किमतीचे अनधिकृत एचटीबीटी बियाण्याची १४६ पाकिटे आढळून आली.
याप्रकरणी भरारी पथकातील मोहीम अधिकारी जे.एस.बोराळे यांच्या खबरीवरून गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे (रा. खापर, ता. अक्कलकुवा) यांच्याविरोधात अनधिकृत कापूस (एच.टी बी.टी.) वाहतूक, साठवणूक व विक्रीबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिली आहे.
सदर कारवाई गट विकास अधिकारी पुलकित सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक तानाजी खर्डे, कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, तंत्र अधिकारी विजय मोहिते, कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांच्या पथकाने केली.
परिक्षाविधीन आय ए एस अधिकारी पुलकित सिंह यांची अक्कलकुवा येथील गट विकास अधिकारी म्हणून एक महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता.