अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बोल्हेगाव परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 64 हजार 381 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी किशोर धोंडीराम कराळे (वय 45, रा. भैरवनाथ मंदिर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किशोर कराळे हे आपल्या कुटुंबासह शनिवारी (11 ऑक्टोबर) सकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दोन दिवसांनी, म्हणजेच सोमवारी (13 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता ते घरी परतले असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात प्रवेश करताच त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले आणि कपाटातील लॉकर उघडे दिसले. कराळे यांनी कपाटाची तपासणी केली असता, त्यात ठेवलेले सोन्याची चेन, मंगळसूत्र, कानातील रिंग आणि बदाम असा एकुण 52 हजार 26 रूपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले.
तसेच कराळे यांच्या घरापासून जवळच असलेल्या एकता कॉलनीमधील नवनाथ गोपीनाथ शिंदे यांच्याही घरी चोरी झाल्याचे उघड झाले. शिंदे यांच्या घरातून चोरट्यांनी 12 हजार 355 रूपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये सोन्याचा बदाम, लहान मुलांची चांदीची साखळी आणि पैंजण यांचा समावेश आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.




