अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बोल्हेगाव येथील भोर मळा परिसरातील एका कॉलनीत भरदिवसा एका महिलेच्या घरात घुसून धाडसी चोरी झाल्याची घटना 9 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सुनीता तुपेरे असे या पीडित महिलेचे नाव असून दोन चोरट्यांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली आणि सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या घरात झोपलेल्या असताना दोन अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला.
महिलेचा गळा दाबून कानातील व गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. यात त्यांच्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर चोरट्यांनी खिडक्या-दरवाजे बंद करून महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि तोंडावर उशी दाबली. आपला जीव वाचवण्यासाठी महिलेने प्रसंगावधान राखून मेल्याचे सोंग केले. महिला मरण पावली असे वाटल्याने चोरट्यांनी उशी बाजूला काढली, तेव्हा महिलेने तोंडातला बोळा काढून त्यांना झटकून दिले.
महिला आता ओरडेल या भीतीने चोरट्यांनी दरवाजा उघडून बाहेर उभ्या असलेल्या एका पांढर्या रंगाच्या गाडीतून पळ काढला. या घटनेत चोरट्यांनी पाच ते सात तोळे सोन्याचे दागिने, 16 हजार रुपयांची रोकड आणि चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल चोरून नेले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली.




