मुंबई | Mumbai
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) क्रुझ शीप ड्रग्ज प्रकरणात (cruise drug case) काही दिवसांपूर्वी क्लीन चिट दिली होती. एनसीबीने (NCB) आर्यन खानसह ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळली होती.
या प्रकरणात आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. न्यायालयाने अनेक सुनावण्यानंतर आर्यन खानला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणात आर्यन खानला एनसीबीनं क्लिन चीट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आर्यन खानच्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. याप्रकरणी तब्बल ३६ पानांची कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती हिंदू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान यास घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात क्रुझवर पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान याने गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांना पुढे मान्य केले होते. त्या आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन खान सह त्याच्या सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत दोषारोपपत्रातून नावे वगळली, असा आरोप हिंदू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही ते न्यायालयात केसच्या दरम्यान टिकणार की नाही ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले, असा आरोप हिंदू महासंघाने केला.