मुंबई | Mumbai
प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित “आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे.
यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातही आदिपुरुष प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी या चित्रपटावर टीका केली आहे. आमदार राम कदम यांनी एक ट्विट केलं आहे.
यात त्यांनी म्हटलंय, आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्राच्या प्रदर्शित होऊ देणार नाही.आदिपुरुष या चित्रपटात पुन्हा एकदा, चित्रपट निर्मात्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची’.
यादरम्यान मनसेने मात्र या चित्रपटाला पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे’.
अमेय खोपकर पुढे म्हणाले आहेत, ‘ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’च्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे’.