आज दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी हा पूर्ण मुहूर्त मानला जातो. अडचणींचा काळ संपत आला अशी भावना दर दसर्याला लोकांच्या मनात दाटून येते. यंदाही तसेच वाटत आहे आणि ते स्वाभाविकही आहे. कारण माणूस आशेवर जगतो. कधीतरी आयुष्य सुखकर आणि सुंदर होईल या आशेवर प्राप्त परिस्थितीत आनंद मानतो. यंदाही त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. पावसाळा जास्त झाला आहे. सुरुवातीला पावसाची चातकासारखी वाट पाहाणारी माणसे आता मात्र त्याच्या परतीची वाट पाहात आहेत.
जुन ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सरासरीच्या तब्बल 25 टक्के पाऊस जास्त झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. शेतीचे चांगलेच नुकसान झाले. कांद्याची रोपे आडवी झाली. टोमॅटोचे फळ गळून पडले. नवीन छाटण्या झालेल्या द्राक्षबागांच्या नवीन फुटीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. सोयाबीन, उडीद, तूर ही पीके काढणीला आली आहेत. काहींच्या शेतीत गुडघ्याएवढे पाणी साठल्याने ही पीके सडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात लम्पी रोगाची भर पडली आहे. शेतकरी शेतीला जोड म्हणून पशूपालन करतात.
पाळीव गायी-म्हशींना होणारा हा एकप्रकारचा त्वचाविकार आहे. या रोगामुळे पशुधनाचा मृत्यू होईल अशी भीती पशूपालकांना वाटत आहे. लम्पी आजारामुळे जनावरे मृत झाली तर त्यांच्या मालकांना आर्थित मदत देण्याची घोेषणा सरकारने केली आहे. या रोगाचे दूरगामी परिणाम हळूहळू स्पष्ट होतील. महागाईचा भडका उडाला आहे. दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवताना सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. सद्यस्थितीत पावकिलो भाजी विकत आणणे देखील अनेकांना न परवडणारे आहे. असा समस्यांचा झाकोळ असला तरी रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल दडलेला असतो हेही माणसे जाणून आहेत. तरुण शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत आहेत.
रासायनिक शेतीचा बोलबाला असताना काही शेतकरी निसर्गशेती करत आहेत. त्यातून उगवलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवत आहेत. निसर्गशेती करणार्या नाशिकमधील शेतकर्यांच्या गटाने शेतमाल विकणारा मॉल देखील सुरु केला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. गरीब कुटुंबांना रवा, चणाडाळ, साखर, तेल आणि मैदा नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतीतील प्रश्नांमुळे शेतकर्यांच्या तणावात वाढच होते. याच तणावावर शास्त्रशुद्ध पद्धतीने मात कशी करायची हे आता कृषी महाविद्यालयांमध्ये शिकवले जाणार आहे. योग, ध्यान, माणुसकी, नातेसंबंधांचे महत्व, व्यवसाय किंवा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि वृत्ती अधिक चांगली कशी ठेवता येईल अशा अनेक मुद्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. तो मोफत शिकवला जाणार आहे. अशा आशा करायलाही पुष्कळ जागा आहेत.
‘थांबू नका पुढे पुढे चला..थांबत्याला पराजय, चालत्याला जय’ असे कुसुमाग्रजांनीही म्हंटले आहे. सगळ्याच सामान्य माणसांना भलेही कविता उमगत नसेल. त्यातील भावार्थ सर्वांच्याच लक्षात येत नसेल. पण कुसुमाग्रजांचा हा उपदेश माणसे मात्र रोज अंमलात आणतात. सणांचे स्वागत उत्साहात करतात. आनंद साजरा करायला पैसे लागत नाहीत असे स्वत:ला बजावतात. त्यामुळेच दसरा साजरा करत असताना माणसांना दिवाळीचे वेध लागले आहेत. दसर्याला सीमोल्लंघन करण्याची परंपरा आहे. रोजच्या रोज भेडसावणार्या अनंत अडचणींचेही सीमोल्लंघन करायला शिकत आहेत. पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन करताना नकारात्मकेतेचही सीमोल्लंघन माणसे नक्की करतील हीच आशा. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा!