उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यालगत गुरुवारी (दि. 25 सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास एका 30 ते 35 वर्ष वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह रस्त्यालगत पडलेला असल्याचे प्रथम काही स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रुग्णवाहिका काही वेळात दाखल झाली, मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह बघण्यासाठी नागरिकांची उपस्थिती कायम होती. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांना वारंवार गर्दी हटवण्याचे आवाहन करावे लागले.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार संजय राठोड, सुरज गायकवाड, सुनील निकम, पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे, नजीम शेख, अंकुश भोसले, ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मृतदेहाच्या आजूबाजूला काही वस्तू मिळतात का याची तपासणी केली. सदर मृतदेह रस्त्यालगत आढळल्याने हा अपघात आहे की घातपात किंवा आत्महत्या, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाची स्थिती पाहता घटना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, स्थानिक पोलीस ठाण्याने नागरिकांना काही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.




